
प्रतिष्ठानचा इशारा, जयंती उत्साहात साजरी
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याचा ठराव राज्य सरकारने करूनही हा प्रस्ताव पेंद्र सरकारकडे धूळ खात पडला आहे. हा राष्ट्रपुरुषाचा अवमान आहे. मोर्चे काढून, पत्रव्यवहार करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत असेल तर 16 एप्रिलपासून आझाद मैदानात उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी दिला.
नाना शंकरशेट यांची 121वी जयंती अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आणि नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दादर टीटी, खोदादाद सर्कल येथील नाना शंकरशेट उड्डाणपुलाखालील मैदानात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाचे सहआयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्यासह नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर दाभोळकर, सल्लागार प्रकाश चिखलीकर, अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, दैवज्ञ संदेशचे प्रकाशक रवींद्र माहीमकर यांच्यासह असंख्य नानाप्रेमी उपस्थित होते. नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण केल्यानंतर सुरेंद्र शंकरशेट यांच्या हस्ते चक्रपाणी अल्ले यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आवाहन पत्रक व स्मारकाच्या निधीसाठी बनवलेल्या क्लिपचे उद्घाटन करण्यात आले.
नाना शंकरशेट यांच्या वडाळ्यातील स्मारक संकुलाला 25 कोटी रुपये राज्य सरकारने द्यावेत यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱयांनी पाठपुरावा केला. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच मुंबई सेंट्रल येथील टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याचा प्रस्तावही पेंद्राकडे धूळ खात पडला आहे. त्यासाठी पत्रव्यवहार केले, मोर्चे काढले. परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे. अण्णा हजारे आणि जरांगे यांनी उपोषणे केल्यावर त्यांच्या मागण्यांची सरकार तत्काळ दखल घेते. सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन आंदोलन छेडले जाईल. त्यासाठी 16 एप्रिलला आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अॅड. मनमोहन चोणकर यांनी दिला.
निधी लवकरच मिळेल
नाना शंकरशेट उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिका लवकरच हाती घेणार असल्याची ग्वाही सहआयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी दिली. तसेच वडाळ्यातील स्मारकासाठी महापालिकेने भूखंड दिला. आता 25 ते 30 कोटींचा जो निधी लागेल तोही लवकरच उपलब्ध होईल, असेही अल्ले या वेळी म्हणाले.



























































