
कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलाची हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी येथे घडली. लक्ष अधिकारी असे मृत मुलाचे नाव आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी नंदन अधिकारीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नीला धडा शिकवण्यासाठी नंदनने हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
नंदन हे मालवणी गावात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. नंदनची मुलगी ही आठवीत तर लक्ष हा ज्युनिअर केजीत शिकत होता. काही दिवसांपूर्वी नंदनचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला होता. त्या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असायची. शनिवारी नंदनच्या मुलीच्या शाळेत ओपन डे होता. त्यामुळे नंदनच्या पत्नीने त्याला शाळेत सोबत जाऊ असे सांगितले. तेव्हा नंदनने शाळेत जाण्यास नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. लक्ष हा झोपला असल्याने नंदनची पत्नी आणि मुलगी या दोघी शाळेत गेल्या. काही वेळाने नंदनची पत्नी घरी आली तेव्हा लक्ष हा रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. लक्षची हत्या केल्यानंतर नंदन हा मालवणी पोलीस ठाण्यात गेला. त्याने मुलाची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्या माहितीनंतर मालवणी पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी लक्षला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.




























































