नगर जिल्हा हादरला, नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कैलास भाऊसाहेब गायकवाड असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आजीने आरोपीविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहणाऱ्या नराधम कैलासच्या अंगावत वासनेचा आगडोंब उसळला. या वासनेच्या आगीत बाप-लेकीच्या नात्याची राख करत आरोपीने आपल्याच 12 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने आधी हा प्रकार कोणाला सांगितला नाही. परंतु घरातल्यांना संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता बापाचे विकृत कृत्य तिेने सांगितले. यामुळे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला. अखेर शुक्रवारी पीडित मुलीच्या आजीने राहुरी पोलिसात फिर्याद दिली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन नराधम बापाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच गायकवाड याने या विकृत गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी कैलास गायकवाड याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ करीत आहेत.