
प्रेम आयुष्यातला हळूवार क्षण… नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन ‘फतवा’ हा संगीतमय प्रेमपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ब्ल्यू लाइन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतीक गौतम दिग्दर्शित या संगीतप्रधान चित्रपटातून प्रतीक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर येत आहे.
नाटय़स्पर्धेत लहानपणापासून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारा अभिनेता प्रतीक गौतमने आजवर एकांकिका, शॉर्टफिल्म यांचे लेखन, दिग्दर्शन व अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘काहुर’ लघुपटाला पारितोषिक मिळाले आहे. ग्रामीण भागातल्या प्रतीकने मेहनतीने आपल्या इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. ग्रामीण भागातील, सामान्य कुटुंबातील मुलाला चित्रपटसृष्टीत मोठा ब्रेक मिळाला आहे. ‘फतवा’चे संगीत विविध जॉनरची गीते आहेत. विशेष म्हणजे अराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेली ‘अली मौला’ ही साबरी ब्रदर्स यांनी गायलेली कव्वाली या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.