अभिप्राय – बालमनाचे भावविश्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> धोंडीराम राजपूत

बालमनाच्या भावविश्वात रमून त्यांच्या भावभावनेला शब्दरूपी काव्यात गुंफणारे मराठवाडय़ातील बालकवी म्हणजे अय्युब पठाण लोहगावकर हे होय. त्यांचा बालमनाचा ठाव घेणारा ‘ज्ञानपोई’ कविता संग्रह म्हणजे बालकांना मिळणारे ज्ञान, शैक्षणिक मूल्यांचा अनमोल खजिना होय. या बालकविता संग्रहात एकूण 58 कविता आहेत.

‘ज्ञानपोई’ या बालकविता संग्रहातील पहिलीच कविता आहे ती म्हणजे ‘गुरू’, तर शेवटची कविता आहे ‘सुंदर सकाळ.’ सर्व जगाचे कधीकाळी कल्याण व्हायचे असेल तर गुरूचे महत्त्व आहे. अशा या गुरूचा महिमा कवीने सुंदर अक्षरांची शृंखला गुंफून वर्णन केला आहे. शाळेला ‘ज्ञानपोई’ म्हणणारा हा कवी खरोखर अद्वितीय होय. ज्ञान आणि दान यांची सांगड ‘दान दे’ या कवितेतून कवीने करून दिलेली आहे. ‘मायबाप’, ‘माझे आजोळ’, ‘माझी आई’, ‘आजी आई’, ‘आजीची काठी’ या कवितांतून कवीने कौटुंबिक जीवन, कौटुंबिक विश्वाची बालकांना जाणीव करून दिलेली आहे. कुटुंबातील संस्कार नैतिकता, नीतिमूल्ये, संस्कार, संस्कृती आज लोप पावत आहे याची खंत कवीला आहे. म्हणूनच कवीने आपल्या कवितांच्या माध्यमातून संस्कार पेरणी करण्याचा छानसा प्रयत्न ‘मायबाप’ या कवितेतील…

‘जेव्हा मस्तक झुकते
मातापित्याच्या चरणी
सुसंस्काराची देणगी ही
मायबापाची पेरणी’

या अत्यंत मनोभावक ओळीत केला आहे. मुलांनी पुस्तकांशी मैत्री करावी म्हणून कवीने ‘पुस्तकांशी दोस्ती’ कविता लिहून ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला आहे. मुलामुलींपर्यंत पोहोचविण्याचा कवीचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. सर्व लोक प्लॅस्टिकचा वापर करतात हे कवीने दाखवून दिले आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा जिकडे तिकडे वापर मानवासाठी नित्य असा आहे. कवीने प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याचे दुष्परिणाम बालकांना पटवून सांगण्याचा प्रयत्न उत्तम प्रकारे केलेला आहे. ‘पर्यावरण’ ही खूप सुंदर कविता लिहिताना पर्यावरणाची जाणीव करून दिली आहे-

‘पाणी म्हणजे जीवन
वापर करा जपून
दुरूपयोग केल्यास
जाईल लवकर संपून’

ही अत्यंत सुंदर रचना आहे. कारण पाण्याच्या बचतीसाठी अनमोल संदेश आहे. तसेच आज मोबाइलचा सर्रास वापर होत आहे. मुलांवर सतत मोबाइल वापराने दुष्परिणाम वाढत आहेत याची जाणीव ‘नको मोबाइल’ या कवितेतून कवीने करून देऊन मोबाइल वापरापेक्षा आजी महत्त्वाची आहे हे सांगितले आहे. ‘मी ज्ञानपोई होईन’ ही कविताही अत्यंत कल्पकतेतून कवीच्या लेखणीतून साकार झालेली आहे. सण-उत्सवांवरील कविताही मुलांच्या मनाला भावणाऱया आहेत. विदयार्थी आदर्श असावा हे ‘आदर्श विद्यार्थी’ कवितेतून कवीने सादर केले आहे. ‘चिंगीचे झाड’, ‘उन्हाळी सुट्टय़ा’, ‘चंद्रावरची शाळा’, ‘फुलपाखरे’, ‘जादूगार’, ‘डोरेमॉन’, ‘भाज्यांचे भांडण’, ‘गंमतगाणी’, ‘चांदोबाचे घर’ या सर्व कविता विद्यार्थ्यांना गुणगुणायला आवडतील यात तीळमात्र शंका नाही. अय्युब पठाण लोहगावकर हे बालमनाचा ठाव नि भाव जाणणारे कवी आहेत. सतत विद्यार्थ्यांत रमत गमत असताना त्यांच्या भावविश्वाचा सखोल अभ्यास करून त्यांनी शब्दरूपी कवितांसाठी ही केलेली गुंफण मुलांना नक्कीच आवडेल.

ज्ञानपोई
कवी : अय्युब पठाण लोहगावकर
प्रकाशक : तेजस प्रकाशन, संभाजीनगर
पृष्ठे : 64, मूल्य : रुपये 100/-