
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल फेसबुकवर अपशब्द वापरल्याप्रकरणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू सागर रामसिंग कोल्हे यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.10) रात्री उघडकीस आला..
मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी दिली. त्यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून काही वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या. याप्रकरणी सोशल मीडियावर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
माफी मागा; अन्यथा आंदोलन
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या कुटुंबीयांवर संस्कार बिंबवायला का कमी पडले, हे त्यांनी जाहीर करावे. तसेच त्यांच्या बंधूंच्या या घाणेरड्या वर्तणुकीबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची जाहीर माफी मागावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा गांजाळे यांनी यावेळी दिला.































































