वंदे भारत एक्स्प्रेसनंतर लवकरच देशात हायड्रोजनवर धावणारी ट्रेन सुरू होणार आहे. हायड्रोजन ट्रेनच्या संचालनामुळे हिंदुस्थानला शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्यात मोठी मदत होणार आहे. सध्या जगातील फक्त चार देशांमध्ये हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू आहे. आता हिंदुस्थान लवकरच या यादीत येणार आहे. पहिली हायड्रोजन ट्रेन 2024-25 मध्ये सुरू होऊ शकते. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याची चाचणी पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार ट्रेन
देशातील पहिल्या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा प्रोटोटाइप डिसेंबर 2024 मध्ये हरयाणाच्या जिंद-सोनीपत विभागात चालवला जाणार आहे. हायड्रोजन ट्रेनसाठी निवडण्यात आलेल्या हेरिटेज मार्गांमध्ये माथेरान हिल रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका-शिमला रेल्वे, कांगडा व्हॅली आणि निलगिरी माऊंटन रेल्वे यांचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील तीन वर्षांत या मार्गांवर हायड्रोजन गाड्या धावू लागतील, ज्या देशाच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे दर्शन घडवतील. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये प्रोटोटाइप ट्रेनचे काम सुरू आहे.
35 ट्रेन सुरू होणार
चाचण्यांनंतर रेल्वे ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ उपक्रमांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची योजना आखत आहे. प्रत्येक ट्रेनसाठी 80 कोटी रुपये आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 70 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आहे. हायड्रोजन ट्रेन पर्याकरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. त्यामुळे जराही प्रदूषण होणार नाही. रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला नेट झीरो कार्बन एमिटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.