
सामना प्रतिनिधी, कळवण
कळवण तालुक्यातील भैताणे येथे अंदाजे दहा लाखांची बिबटय़ाच्या कातडीची तस्करी करणाऱयास विशेष पोलीस पथक नाशिक व वन विभागाच्या कर्मचाऱयांनी अटक केली आहे. तस्करींकडून बिबटय़ाची कातडी हस्तगत करण्यात आली आहे. काळ्याबाजारात या कातडीची किंमत 10 लाख रुपये आहे.
कळवण तालुक्यातील मौजे कनाशी वन परिक्षेत्रातील भैताने येथील भावराव गायकवाड (42) हा बिबटय़ा प्रजातीच्या प्राण्याची कातडी भैताने फटाहून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यांनी वन विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाई करत त्यास सापळा रचून कातडीसह अटक केली.
दिवसभर वन विभागाने तपास करून संजय भान्शी (47), राजू चौरे (30), विश्वनाथ पालवी (34), अमरचंद बागुल (54), उंबरेबन या चार संशयित सहआरोपींना अटक केली. कळवण न्यायालयात आरोपीना हजर केले असता अधिक तपासासाठी 19 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांना अभोणा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनास गडाख, पोलीस हवालदार किशोर अहिरराव, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे, सहाय्यक वन संरक्षण सुरगाणा विभाग सुजित नेवसे, वनपरीक्षेत्र अधिकारी कनाशी सी.आर. कामडी, वनपरीक्षेत्र अधिकारी कळवण बी.आर. शेखयांच्यासह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक व वनविभाग यांनी संयुक्त कारवाई करत आरोपीना वन्यजीव जीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली आहे.




























































