आषाढी यात्रेकरीता 5 लाख बुंदी लाडू तयार: 12 लाख बुंदी लाडू तयार करण्याचे नियोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी वारी करीता येणार्‍या भाविकांना बुंदी लाडूचा प्रसाद अल्प दरात विक्री करीता उपलब्ध करुन देण्यात आला असून आतापर्यंत 5 लाख बुंदी लाडू तयार करुन विक्री करीता सज्ज ठेवण्यात आले आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्यावतीने आषाढी यात्रेस येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेवून बुंदी लाडूचा प्रसाद विक्री करण्यासाठी 12 लाख बुंदी लाडू तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार दि. 3 जुलै पासून सुमारे 70 महिला व पुरुष कर्मचार्‍यांमार्फत तीन पाळ्यांमध्ये बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत. दररोज 90 हजार लाडू तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख लाडू तयार करुन विक्री करीता पाठवण्यात आले आहेत.दि. 17 जुलै पर्यंत 12 लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत.

एक बुंदी लाडू 70 ग्रॅम वजनाचा असून एका पॉकेटमध्ये दोन बुंदी लाडू पॅक करण्यात येत आहेत. 12 लाख बुंदी लाडू तयार करण्यासाठी 30 टन हरभरा डाळ, साखर 35 टन, शेंगदाना रिफाईंड तेल 40 टन, बेदाना 1 टन, वेलदोडे 1 टन असे साहित्य वापरण्यात येत आहे. लाडू तयार करताना कामगारांकडून स्वच्छता काटेकारपणे पालन करण्यात येत असून अन्न व औषध प्रशासन वेळोवेळी भेट देवून तपासणी करत असल्याने सुवर्णक्रांती महिला उद्योग सेवा सह.संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

एमटीडीसी येथील लाडू केंद्रात आषाढी यात्रेकरीता 12 लाख लाडू तयार करण्यात येत आहेत. दि. 17 जुलै पर्यंत बुंदी लाडू तयार करण्यात येणार आहेत. तयार झालेले बुंदी लाडू गोडावूनमध्ये ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विक्री करीता मंदीर समितीच्या तीन लाडू विक्री केंद्रावर नेण्यात येत आहेत. लाडू जे आण करण्याचे व विक्री करण्याचे काम मंदीर समितीचे कर्मचारी करत आहेत. भेसळ होऊ नये म्हणून मंदीर समितीच्या वतीने लाडू केंद्राच्या ठिकाणीच हरभरा डाळीचे पीठ तयार करणारी गिरणी चालू केलेली आहे. साखरेचीही बारीक पीठ येथेच तयार करण्यात येत आहे.
एकादशी दिवशी भाविकांचा उपवास असल्याने फराळासाठी मंदीर समितीकडून लाडू विक्री केंद्रावर 1 लाख राजगिरा लाडू विक्री करण्यात येणार आहे.

चार ठिकाणी लाडू विक्री केंद्र
आषाढी यात्रेत मंदीराच्या पश्‍चिम व्दार, उत्तरव्दार, पुर्वव्दार येथे बुंदी लाडू विक्री करण्यात येत आहे. तर भाविकांच्या मागणीखातर 65 एकर येथेही लाडू विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे.