झेंडू, आपटा, नव्याच्या खरेदीसाठी संगमेश्वरातील बाजारपेठा गजबजल्या; झेंडू 80 ते 100 रुपये किलो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडू , नवं आणि आपट्याच्या विक्रीसाठी ठिकठिकाणाहून व्यापारी संगमेश्वरात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. इतरवेळी 40 रुपये किलो असणाऱ्या झेंडूने आज दुप्पट दर गाठत थेट 80 ते 100 रुपये किलोवर मजल मारली. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात आज दिवसभर झेंडूच्या पिवळ्या आणि केशरी फुलांच्या रंगांनी उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

दसरा सण म्हटला की, आपट्याच्या पानांची म्हणजे सोन्याची देवाणघेवाण केली जाते. यासाठी आपट्याच्या फांद्या मिळवणं हे एक मोठे काम असते. ग्रामीण भागातून आज असंख्य विक्रेत्यांनी आपट्याच्या फांद्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणून व्यवसायाची ही सोन्यासारखी संधी साधल्याचे दिसून आले. 25 ते 50 रुपयांमध्ये आपट्याच्या छोट्या फांद्या घेऊन ग्राहकवर्ग झेंडू आणि नवं खरेदीसाठी धावपळ करीत असल्याचे पाहायला मिळाले. कोणतेही नवीन वाहन घेतांना शुभारंभाप्रसंगी झेंडूच्या फुलांचा हार घालण्याची पध्दत आहे.

दसऱ्याच्या आदल्या दिवशी वाहने स्वच्छ धुवून त्यांना हार घालण्याची प्रथा आहे. यासह घराच्या दरवाजांना , पुस्तकांना , विविध हत्यारांच्या पूजनासाठी झेंडूची फुले वापरली जातात. कोकणच्या ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतीच्या बांधावर झेंडूची लागवड करुन आणखी एक आंतरपिक घेऊन दसऱ्या आधी झेंडू विक्रीतून चार पैसे गाठी बांधतो. नवान्न पौर्णिमेला कोकणच्या घराघरात नवं बांधण्याची प्रथा आहे. या नव्यामध्ये नवीन भात पिकांच्या लोंबी, नाचणी – वरीचं कणीस , झेंडू आणि कुरडूचे फुल लावले जाते. नव्या हंगामात नवं पिक आलेलं असल्याने शेतकरी वर्ग आनंदी असतो आणि यासाठीच नवं बांधून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शेतकऱ्यांची प्रथा नक्कीच अभिनंदनीय म्हटली पाहिजे. यासाठीच आज फुले आणि विविध प्रकारच्या खरेदीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झालेली दिसून आली.