शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांची परभणीकरांना एफ.एम. रेडिओची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहुप्रतिक्षीत व बहुचर्चीत परभणी एफ.एम. रेडिओ प्रसारणाला थाटामाटात प्रारंभ झाला. अक्षदा मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री यानिमित्त जंगी उद्घाटनासह परभणीच्या मातीतील उंच भरारी घेतलेल्या गुणगौरवांचा सत्कार आणि संगीत मैफील अशा त्रिवेणी कार्यक्रमात परभणीकर जनता मंत्रमुग्ध झाली होती. प्रसिद्ध सिनेगायिका अमृता नातू व झी टिव्हीवरील रॉकस्टार रोहित राऊत यांच्या सुश्राव्य व सुरेल आवाजात हा संगीतमय सोहळा पार पडला.

शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर प्रास्ताविक भाषणात जे मुंबई-पुणे येथे मनोरंजनासाठी अद्यावत तंत्रज्ञान आले आहे, तेच आधुनिक तंत्रज्ञान एफ.एम. रेडियोच्या निमित्ताने परभणीत आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. विकास कामे करतांना मी कुठेही कमी पडणार नाही. त्याच बरोबर यापुढेही मेट्रो शहरात असलेले प्रत्येक तंत्रज्ञान परभणीकरांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार डॉ. पाटील यांनी दिली.

विद्यापीठ रोडवरील अक्षदा मंगल कार्यालयात परभणी एफएम रेडिओ ९०.८ चा हा त्रिवेणी उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर हभप अच्युत महाराज दस्तापूरकर, आमदार डॉ.राहुल पाटील, नांदेड कुलगुरु उद्धव भोसले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, मिस्टर इंडिया दारासिंग खुराणा, प्रसिद्ध गायिका अमृता नातू, रॉकस्टार रोहित राऊत, केंद्रप्रमुख अ‍ॅड.श्रीनिवास सोळूंके, संचालिका अर्चना डावरे, केंद्र समन्वयक शेख साजीद यांची उपस्थिती होती.

‘आपली परभणी आपला आवाज’ परभणी एफएमचे बटन दाबून यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात गुरुवार पासूनच एफ.एम. रेडीओच्या ९०.८ च्या प्रसारणास सुरुवात झाली आहे. यानंतर कार्यक्रमात शास्त्रीय गायक डॉ.गुलाम रसूल यांचे शिष्य देविदास अर्धापूरकर, डॉ.कमलाकर परळीकर, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव अंभुरे, गणेश वाचनालयाची शतकीधूरा सांभाळणारे प्रमाणिक कष्टाळू असे पद्माकर पेडगांवकर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.अशोक सोनी, कवी इंद्रजीत भालेराव, साहित्यिक डॉ.आसाराम लोमटे, ओमशांतीच्या ज्येष्ठ साधिका अर्चना दिदी, चळवळीचे नेते बी.एच.सहजराव, मिस्टर इंडिया दारासिंग खुराणा, मॅरेथॉन धावपटू ज्योती गवते, अभिनेता संकर्षण कNहाडे, अजिंक्य राऊत यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर बॉलीवूड सिंगर अमृता नातू व झी टिव्ही रॉकस्टार रोहित राऊत यांच्या संगीत मैफिलीचा बहारदार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत जेठवानी यांनी केले. कार्यक्रमास परभणीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.