
झणझणीत कोंबडी वडे, चवदार मच्छी टिक्का, सुरमई-बांगडा फ्राय, भरलेले पापलेट, मालवणी रोल यासह कोकणी मेव्याचे एकसे बढकर एक मेनू देणाऱ्या विलेपार्ले येथील सिंधुदुर्ग हॉटेलने कोरोनाविरोधातील लढ्यातही आपली लज्जत कायम ठेवली आहे. शासनाकडून हॉटेल-रेस्टारंट सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कोविडच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन खवय्यांची भूक भागवली जात आहे.
दादर येथे सिंधुदुर्ग हॉटेलची सुरुवात 1982 मध्ये झाली. या हॉटेलचे शेफ आणि ओनर अजिंक्य देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खास कोकणच्या पदार्थ्यांची मेजवानी खवय्यांना देण्यात आली. त्यामुळे अवघ्या काही दिवसांतच शेकडो खवय्ये सिंधुदुर्गमधील कोकणी पदार्थ्यांचा आग्रह धरू लागले.
सद्यस्थितील दादर येथील हॉटेलला नवे रूप देण्याचे काम सुरू असून विलेपार्ले येथील हनुमान रोडवर असलेल्या ‘सिंधुदुर्ग’मध्ये खवय्यांची भूक भागवली जात आहे. याठिकाणी नाश्त्यासह युवकांमध्ये क्रेझ असणारे वेज-नॉनव्हेज रोलसारखे पदार्थही उपलब्ध असतात. अजिंक्य देसाई यांच्या माध्यमातून मुंबईकरांना दर्जेदार पदार्थ दिले जात असतानाच लंडन, जपान, दुबई, सिंगापूर अशा ठिकाणी कन्सलटिंगची भूमिकाही बजावली जात आहे.
आगामी काळात हिंदुस्थानातून परदेशात जाणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या हिंदुस्थानातील ठिकाणचे पदार्थ बनवून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचेही देसाई यांनी सांगितले. शिवाय लवकरच लंडन, कश्मीरमध्येही पर्यटकांची भूक भागवण्याची सेवा सिंधुदुर्ग या नावाने सुरू करणार असल्याचे देसाई म्हणाले.
मालवणी महोत्सव ठरणार आकर्षण
सिंधुदुर्ग हॉटेलच्या माध्यमातून डिसेंबरमध्ये विलेपार्ले येथे दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात खास मालवणी महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे शेफ अजिंक्य देसाई यांनी सांगितले. यामध्ये वडेसागोती, घावणे, सांबार यांसह शेंगदाणा, खटखटे लाडू, खाजा अशा कोकणच्या विविध पदार्थांची चव चाखता येणार असल्याचे देसाई म्हणाले. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर स्वत: रेसिपी बनवणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह कोकणी माणसांनी या ठिकाणच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन देसाई यांनी केले आहे.


























































