अरण्य वाचन…वाघांना  जपणारा शिकारी

198

अनंत सोनवणे,[email protected]

जिम कॉर्बेट हा सुप्रसिद्ध ब्रिटिश शिकारी… शिकार सोडून लेखन व छायाचित्रण करीत त्यानं अवघं जीवन वाघ आणि जंगलांच्या जतनासाठी वाहून घेतलं…

हिंदुस्थानातलं सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान म्हणजे उत्तराखंड राज्यातलं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. जिथं एकेकाळी वाघांचा प्रचंड संहार झाला, पण तिथंच आज वाघांना संरक्षित अधिवास लाभलाय. फार पूर्वी या अरण्याला रामगंगा अरण्य म्हटलं जायचं. रामगंगा नदी गढवाल आणि कुमॉऊमधून वाहत येत रामनगरच्या मैदानी प्रदेशात उतरते. या सुपीक खोऱयात रामगंगा अरण्य पसरलंय. 1820 साली इंग्रज इथं पोहोचले आणि या अरण्यातल्या झाडांची कत्तल सुरू झाली. या जंगलात वाघ आणि इतर वन्य जीवांची संख्या भरपूर होती, पण ब्रिटिश अधिकारी आणि स्थानिकांनीसुद्धा इथं अनिर्बंध शिकार केली. शौर्य मिरवण्यासाठी वाघांचा बेसुमार संहार झाला. गव्हर्नर माल्कम हेली याला संहारानं अतीव दुःख झालं. त्यानं वाघांच्या शिकारीवर बंदी आणली. पुढे ब्रिटिश सरकारनं 8 ऑगस्ट 1936 साली हे अरण्य राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केलं. हिंदुस्थानातल्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानाला माल्कम हेलीचं नाव देण्यात आलं. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर त्याचं रामगंगा राष्ट्रीय उद्यान असं नामकरण झालं, तर 1957 साली उत्तर प्रदेश सरकारने त्याला जिम कॉर्बेटचं नाव दिलं.

जिम कॉर्बेट हा सुप्रसिद्ध ब्रिटिश शिकारी 1875 साली नैनिताल इथं जन्माला आला. त्याच्या जीवनाचा बहुतांश भाग याच रामगंगा अरण्यात व्यतीत केला. गढवाल, कुमॉऊ परिसरात हाहाकार माजवणाऱया अनेक नरभक्षक वाघांची त्यानं शिकार केली. पुढे शिकार सोडून लेखन व छायाचित्रण करीत त्यानं अवघं जीवन वाघ आणि जंगलांच्या जतनासाठी वाहून घेतलं. या अस्सल व्याघ्रप्रेमीच्या सन्मानार्थ त्याचं नाव राष्ट्रीय उद्यानाला दिलं गेलं.

bird-ss

1936 साली हे राष्ट्रीय उद्यान अस्तित्वात आलं तरी वाघांची संख्या सातत्यानं घटत होती. 1972 साली इथं फक्त 44 वाघ उरले होते. त्यामुळे 1973 मध्ये कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातल्या ढिकाला वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. हिंदुस्थानातला हा पहिला व्याघ्र प्रकप. प्रकल्पाच्या क्षेत्रातली लोकवस्ती अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली. वाघाला, त्याच्या अधिवासाला पूर्ण संरक्षण मिळालं. वाघांची संख्या वाढू लागली. 1984 साली इथं 90 वाघांची नोंद झाली. आजमितीस इथं 215 च्या आसपास वाघ आहेत. त्यांचं भक्ष्य असलेल्या प्राण्यांची संख्याही इथं विपुल आहे.

वाघांबरोबरच इथं बिबटेही मोठय़ा संख्येने आढळतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणारा बिबटय़ा इथं आदर्श अधिवास लाभल्यानं निर्धास्त झाला आहे. याशिवाय त्याच्या छोटय़ा बहिणी शोभतील अशा रानमांजरी, मत्स्यमांजरी आणि बिबट मांजरीही इथं पाहायला मिळतात. आशियाई हत्ती हा इथला आणखी एक आकर्षणाचा विषय. उन्हाळय़ात इतर जंगलांमधले हत्ती स्थलांतर करून जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात येतात. तेव्हा इथं 25-30 हत्तींचा एक कळप पाहायला मिळतो. उद्यानाच्या बिजरानी परिसरात झिपरं अस्वल दिसतं. तसेच जंगली कुत्र्यांचे कळप शिकारीच्या शोधात भटकताना दिसतात. रामगंगा नदीच्या डोहात मगरी पाहायला मिळतात. दुर्मिळ लांब तोंडाची सुसरही दिसते. नदीकाठावर विसावलेली कासवं आणि पाण्यात शिवाशिवी खेळणारी पाणमांजरं पाहताना मजा येते.

birdy

कॉर्बेट उद्यानात 550 हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात. त्यात गिधाड, पहाडी मैना, पहाडी बुलबुल, सोनपाठी सुतार, नवरंग, विविध प्रकारचे गरुड, करकोचे इत्यादी पक्ष्यांचा समावेश होतो. कालागढ धरणाचा जलाशय तर स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर बनलाय. पट्टकादंब, कृष्णकादंब, सिगल्स, शेकाटे, ऑप्रे, रोहित, कौंच, चक्रवाक, नयनसरी इत्यादी पक्षी हिवाळय़ात युरोप, सैबेरिया, लडाखमधून या जलाशयावर येतात. पक्षीनिरीक्षकांसाठी ही मोठीच पर्वणी ठरते. वाघावर, जंगलावर आणि वन्यजीवांवर प्रेम करणाऱया प्रत्येकासाठी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान बकेट लिस्टमध्ये वरच्या स्थानावर असायलाच हवं.

जिम कार्बेट उद्यान

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हा…नैनिताल

राज्य…उत्तराखंड

क्षेत्रफळ…1318.54 चौ. कि.मी

निर्मिती…1936

जवळचे रेल्वे स्थानक…रामनगर (13 कि.मी.)

जवळचा विमानतळ…दिल्ली (230 कि.मी.)

निवास व्यवस्था…वनविभागाचे विश्रामगृह, खासगी हॉटेल्स

योग्य हंगाम…ऑक्टोबर त जून

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टी…नाही

आपली प्रतिक्रिया द्या