बिहारचे माजी पोलीस संचालक गुप्तेश्वर पांडे यांचा जदयूत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुख्यमंत्री व जदयू प्रमुख नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जदयूत प्रवेश केला. पांडे यांनी दोन दिवसांपूर्वीच महासंचालक पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर ते भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील असे बोलले जात होते.

‘मला मुख्यमंत्र्यांनी स्वत: जदयूत पक्षात येण्याचे आवाहन केले होते. मला आता पक्ष जे काही करायला सांगेल ते मी करेन. मला राजकारण समजत नाही. मी एक साधा व्यक्ती आहे. समाजातील तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यात मी आतापर्यंतचा वेळ घालवला आहे’, असे गुप्तेश्वर पांडे यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितले.

1987 बॅचचे आयपीएस असलेले गुप्तेश्वर पांडे यांनी जानेवारी 2019 मध्ये बिहारचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्विकारला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि केंद्र सरकारने त्यांचा अर्ज 24 तासात मंजूरही केला आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जदयु का भाजप हे स्पष्ट केले नाही.

दरम्यान, 2009 मध्येही भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी गुप्तेश्वर पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. मात्र, त्यांना भाजपने तिकीट दिले नाही. त्यामुळे पांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती मागे घेतली आणि पोलीस दलात दाखल झाले.