मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात दाखल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली आहे. बुधवारी सायंकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील दोन दिवसांपासून हलकासा ताप असतानाच श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कारण नाही, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

89 वर्षीय डॉ. सिंग यांच्यावर एम्सच्या कार्डिओ-न्यूरो टॉवरमधील स्पेशल रुममध्ये उपचार केले जात आहेत. रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर दोनदा बायपास सर्जरी झाली असून मधुमेहाचाही त्रास आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातही त्यांना ताप आणि नव्या औषधाचे रिऍक्शन झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या