
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरातहुन मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक भीषण अपघात झाला. कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट लग्झरी बसला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व प्रवासी गुजरातच्या बारडोली येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हा अपघात कासा पोलीस स्टेशन हद्दीत महालक्ष्मीजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
































































