
दरोडा टाकण्यासाठी एकत्र येऊन कट रचणाऱया चार जणांच्या टोळीला ट्रॉम्बे पोलिसांनी वेळीच उचलले. गुन्हा करण्याआधीच टोळी गजाआड करून पोलिसांनी पुढील अनर्थ टाळला. चेंबूरच्या पांजरापोळ येथील अनुरा अॅनेक्स पाठीमागील मैदानात चार जण जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती अंमलदार प्रदीप देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लगेच याबाबत वरिष्ठांना कळवले. मग पोलीस पथकाने वेळीच त्या ठिकाणी जाऊन लोखंडी कटावणी, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर व टॉर्च आदी साहित्य घेऊन एकत्र जमलेल्या मुझम्मील अन्सारी, मुक्तलिक शेख, अफशान अन्सारी आणि रफिक शेख अशा चौघांना रंगेहाथ पकडले. ट्रॉम्बे पोलिसांनी वेळीच कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने दरोड्याचा गुन्हा होण्याआधीच रोखता आला.

































































