
सामना प्रतिनिधी, मुंबई
सुसाट वेगातील वाहनाने धडक दिल्यामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी आरे कॉलनीच्या फिल्टर पाडा परिसरात घडली. अरहान खान (4) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी आरे पोलिसांनी अभिमन्यू राजेंद्रसिंग सकतावतला अटक केली. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
अरहान हा फिल्टर पाडा येथे राहत होता. तो जुनिअर के.जी.ला होता. मंगळवारी दुपारी अरहान हा फिल्टर पाडा येथे खेळत होता. तेव्हा सुसाट वेगातील वाहनाने धडक दिली. त्या धडकेत अरहान हा गंभीर जखमी झाला. हा प्रकार एका स्थानिक रहिवाशाच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती अरहानच्या नातेवाईकांना दिली. जखमी अवस्थेत अरहानला उपचाराकरिता पवईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताच्या घटनेनंतर नातेवाईकांनी चालकाविरोधात गंभीर आरोप केले.
या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले. अरहानच्या मृत्यूप्रकरणी आरे पोलिसांनी अभिमन्यूविरोधात गुन्हा दाखल केला. अपघातानंतर चालक हा पळून गेला नव्हता. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्याने मद्य प्राशन केले नसल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याचे आरे पोलिसांचे म्हणणे आहे. अभिमन्यूला अटक करून न्यायालयात हजर केले होते.






























































