
वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून ड्रगच्या केसमध्ये अटक करण्याची धमकी देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या हिंदुस्थानातील मुख्य हॅन्डलरला बांगूर नगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. डी. श्रीनिवास राव असे त्याचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यात चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचे परदेशी कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे येथे एक महिला राहते. तिला काही दिवसांपूर्वी एकाने सोशल मीडियावर मेसेज केला. मेसेज करून त्याने आपण आयपीएस अधिकारी असल्याचे भासवले. तुम्ही पाठवत असलेल्या कुरिअरमध्ये ड्रग असल्याचे भासवले. त्यानंतर त्याने महिलेकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. कारवाई होईल या भीतीपोटी महिलेने पैसे दिले. अशाच प्रकारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दोन महिलांकडून पैसे उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिन्ही महिलांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी खास पथक तयार केले. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टिटवाळा आणि कोलकाता येथून चार जणांना अटक केली होती. त्या चौघांच्या चौकशीनंतर पोलिसांना या टोळीतील मुख्य हॅन्डलरची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक विशाखापट्टणम येथे गेले. तेथून पोलिसांनी डी. श्रीनिवास रावला ताब्यात घेऊन अटक केली. फसवणूक करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून त्याचा मुख्य सूत्रधार हा परदेशात आहे. डी. श्रीनिवास राव हा हिंदुस्थानातील मुख्य हॅन्डलर होता. तो कमिशन तत्त्वावर ही टोळी चालवत असायचा. फसवणुकीची रक्कम ही क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करून ती परदेशात पाठवली जात होती, अशी त्याची गुन्ह्याची पद्धत होती.






























































