फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअरपोर्ट ऑथॉरिटी, एअर एशिया, रिलायन्स जिओ अशा नामांकित पंपनीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱया दिल्ली येथील कॉल सेंटरचा मालवणी पोलिसांनी पर्दाफाश केला. संतोषकुमार कामती, आकाश यादव, अल्ताफ हुसेन अब्दुल मन्नान, चंदासिंग राय, हेमलता राठोर अशी त्यांची नावे आहेत. ही टोळी दिल्ली येथे बसून नागरिकांना चुना लावायची.

तक्रारदार हे मालवणी येथे राहतात. गेल्या वर्षी त्यांना एकाचा फोन आला. एअरपोर्ट येथे ग्राऊंड स्टाफची नोकरी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. नोकरीच्या नावाखाली त्याना प्रोसेस फी, प्रमाणपत्र फी असे सांगून त्याच्याकडून 2 लाख 45 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना नोकरीचे पत्र पाठवण्यात आले. पत्र घेऊन ते एअरपोर्ट येथे गेले. तेव्हा अशा प्रकारची नोकरी तेथे नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यानी मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

मालवणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक आयुक्त शैलेंद्र धीवर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अनुराग दीक्षित, संतोष सांगळे, नवनाथ पुंभार आदींच्या पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात गेले, त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक फरिदाबाद येथे गेले. तेथे चौकशी केली. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी संतोषकुमार आणि आकाशला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीनंतर अल्ताफ, चंदासिंग आणि हेमलता यांना अटक केली. त्या पाच जणांना अटक करून मुंबईत आणले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, सिम कार्ड, बँकेची कार्ड जप्त केली आहेत.