
नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच व स्पेनचा दिग्गज खेळाडू रफाएल नदाल हे फ्रेंच ओपन या लाल मातीवरील टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत शानदार कामगिरी करता यावी यासाठी त्याआधी होणाऱया सराव स्पर्धेमध्ये दोघेही खेळणार आहेत. या आठवडय़ात खेळवण्यात येणार्या मॉण्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत दोघेही सहभागी होणार आहेत.
लाल मातीवरील स्पर्धा एक आठवडे पुढे ढकलली
कोरोनामुळे गेल्या मोसमात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा मेऐवजी सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आली होती. यंदाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र यावेळी फक्त एक आठवडय़ाने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मेऐवजी 30 मेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन स्पर्धांमधील फरक कमी झाला
फ्रेंच ओपन स्पर्धेचा अंतिम सामना व विम्बल्डनचा पहिला दिवस यांच्यामध्ये तीन आठवडय़ांचा फरक आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनकडून ठेवण्यात आला होता. पण आता फ्रेंच ओपन ही स्पर्धा एक आठवडय़ाने पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये फक्त दोनच आठवडय़ांचाच फरक असणार आहे.





























































