बाटलीने गळ्यावर वार करून मित्राचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिल्याने झालेल्या वादातून फोडलेल्या दारूच्या बाटलीने गळ्यावर वार करून मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कोथरूड भागात सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सुशांत ओंबाळे (वय २४), त्याचा भाऊ प्रशांत ओंबाळे (वय २५) आणि सागर मेस्त्री (वय २९, तिघे रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षय बाळू जोरी (वय २२, रा. बांदल कॉम्प्लेक्स, कोथरूड डेपोसमोर, पौड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अक्षयचे वडील बाळू जोरी (वय ४८) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अक्षय, सुशांत, प्रशांत आणि सागर मित्र आहेत. सुशांतचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. अक्षयने प्रेमसंबंधाची माहिती सुशांतच्या कुटुंबीयांना दोन वर्षांपूर्वी दिली होती. तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. सोमवारी रात्री अक्षय, त्याचे मित्र आशीष पोकळे, संकेत शिंदे, सुशांत आंबेकर, सुशांत ओंबळे एकत्र होते. त्यावेळी अक्षय आणि सुशांत यांच्यात पुन्हा वाद झाला. रात्री साडेआठच्या सुमारास अक्षय घरी आला. मित्रांसोबत पार्टीला निघालो आहे, असे सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यावेळी घरात त्याचे आई-वडील होते. त्यानंतर सर्वजण आशीष पोकळे याच्या मित्राच्या सदनिकेत दारू पिण्यासाठी गेले.

मध्यरात्री अक्षय आणि सुशांत यांच्यात वाद झाला. मित्रांनी समजूत घालून सुशांतला घरी सोडले. अक्षय मित्रांबरोबर सदनिकेत थांबला होता. पहाटे चारच्या सुमारास सुशांत, त्याचा भाऊ प्रशांत, सागर तेथे आले. त्यांनी सदनिकेचा दरवाजा वाजविला. त्यानंतर सुशांत सदनिकेत शिरला आणि सदनिकेत पडलेली दारूची बाटली फोडली. फुटलेल्या बाटलीने सुशांतने अक्षयच्या गळ्यावर वार केला. अक्षयला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मित्रांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पसार झालेल्या सुशांत, प्रशांत आणि सागर यांना पोलिसांनी दुपारी अटक केली. या प्रकरणाचा कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे तपास करीत आहेत.