
अन्नातील भेसळखोरांविरुद्ध मोहीम उघडणाऱया एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खासगी रुग्णालयात होणारी लूट उघडकीस आणली आहे. अवघ्या 11 रुपयांना मिळणाऱ्या आयव्ही सेट म्हणजेच सलाइनच्या नळीचे तब्बल 325 रुपये ग्राहकांकडून उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी आणि विक्री किमतीत तब्बल 2,841 टक्क्यांपर्यंतचा नफा कमावला जात असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या पाहणीत आढळले आहे. यावर तीव्र आक्षेप घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारच्या एनपीपीए आणि औषध विभागाला पत्र लिहून तातडीने ‘ट्रेड मार्जिन’वर मर्यादा घालण्याची शिफारस केली आहे.
मुंढे यांनी ‘एक्स’ वर भूमिका मांडताना लिहिले की, रुग्णालयातील बिलाचा सर्वात महागडा भाग तो असतो, ज्याचा थेट उपचारांशी संबंध नसतो. रुग्णाला औषध किंवा उपकरणाची मूळ किंमत काय आहे आणि किती नफा वसूल केला जातोय, हे जाणून घेण्याचा अधिकारच उरलेला नाही.
केंद्राकडून आढावा सुरू
केंद्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. उत्पादक आणि मध्यस्थ मध्यंतरीच्या काळात किती मार्जिन जोडतात, याचा आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रच नाही, तर पंजाब, राजस्थान आणि तामीळनाडू या राज्यांतील औषध नियंत्रण अधिकाऱयांनीही अशाच प्रकारच्या नफेखोरीबाबत केंद्राकडे तक्रारी केल्या आहेत.
खासगी रुग्णालये असे पैसे उकळतात
- प्रोडक्ट मूळ किंमत वसूल करतात
- सलाइन सेट 11.5 रुपये – 325 रुपये
- नेबुलायझर मास्क 40 रुपये – 715 रुपये
- सिरिंज 6.76 रुपये – 57.20 रुपये
- कॅथेटर 29.41 रुपये – 310 रुपये
- आयव्ही कॅनुला 22.50 रुपये – 424 रुपये

































































