पेट्रोल पंपचालकांचे ‘नो परचेस डे आंदोलन’, बुधवारी इंधनटंचाई जाणवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने इंधनामध्ये दरकपात केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधनावरील कमिशन न वाढवणे व दरकपातीविरोधात पेट्रोल पंपचालकांची संघटना ‘फामपेडा’ आक्रमक झाली आहे. या धोरणाच्या विरोधात संघटनेच्या वतीने 31 मे रोजी ‘नो परचेस डे’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात 1 जून रोजी पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवणार आहे.

जिल्ह्यात 31 मे रोजी जिह्यातील एकही पेट्रोल पंपचालक कंपन्यांकडून इंधन खरेदी करणार नसल्याची भूमिका घेण्यात आली आहे. कोरोना काळातील अबकारी कर वाढीचा फायदा पेट्रेल पंपचालकांना मिळाला नाही. आता केंद्राने दरकपात केल्याने त्याचा थेट परिणाम पेट्रोल व डिझेलवर झालेला आहे. यामुळे पेट्रोल पंपचालकांचे नुकसान होत आहे. जेव्हा कर वाढवला तेव्हा लाभ मिळाला नाही, तर कर कमी केल्यानंतर नुकसान का सोसायचे? असा सवाल पेट्रोल पंपचालकांच्या संघटनेने केला आहे.

डिझेलमागे प्रतिलिटर साडेतीन रुपयांनी, पेट्रोलमागे प्रतिलिटर सव्वातीन रुपये कमिशन दिले जाते. हे कमिशन वाढलेल्या दरांच्या तुलनेत परवडत नाही. सध्या पेट्रोल व डिझेलचे दर 75 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे कंपन्यांकडून माल खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागतात. वित्त पुरवठा करणाऱया बँकांना जास्त व्याज द्यावे लागत असून, महागाईमुळे खर्च वाढला आहे. या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 जून रोजी पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.