
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेनचे काम गेल्या आठ वर्षांपासून लटकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दुर्लक्षितपणामुळेच या गडावरील फ्युनिक्युलर ट्रेनला ब्रेक लागला असून त्यामुळे लाखो मलंग भक्तांचे प्रचंड हाल होत आहेत. ही फ्युनिक्युलर ट्रेन तातडीने सुरू करा, अन्यथा तीक्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले श्री मलंग हे नवनाथांचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र आहे. मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान असलेल्या या मलंग मुक्तीचे आंदोलन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हाती घेतले. दरवर्षी माघी पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक आणि मलंग भक्त नाथांचा जयघोष करीत मलंगगडावर दाखल होतात. टाळ, मृदंगाच्या गजराने गड दणाणून जातो.
मलंगगडावर येणाऱया भक्तांसाठी फ्युनिक्युलर ट्रेनची व्यवस्था व्हायलाच हवी, असे 2007 मध्ये शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून सांगितले होते. त्यानंतर चक्रे फिरली व राज्य सरकारने मलंगगडावर फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष कामास 2012 मध्ये सुरुवात झाली आणि डिसेंबर 2015 पर्यंत ही सुविधा मिळायला हवी होती. 2014 साली एकनाथ शिंदे हे ठाणे जिह्याचे पालकमंत्री बनले. त्यानंतर तब्बल साडेसात वर्षे त्यांनी पालकमंत्रीपद ‘भूषवले.’ आता ते मुख्यमंत्रीही झाले आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिदे हे गेल्या नऊ वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत, परंतु फोडाफोडीच्या राजकारणात दंग असलेल्या शिंदे पितापुत्रांचे या फ्युनिक्युलर ट्रेन सुरू करण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. त्याचा फटका दरवर्षी माघी पौर्णिमेला गडावर येणाऱया सहा ते सात लाख भाविकांसह आबालवृद्धांना बसत आहे. 1 हजार 360 फूट उंचीचा डोंगर गाठण्यासाठी आणि उतरण्यासाठी पाच किलोमीटर वळणांचा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. धुळीतून, उन्हातान्हातून सहा हजार पायऱया चढणे, उतरणे त्यांच्यासाठी जिकिरीचे होत आहे.
स्वतःच्या दिमतीसाठी हेलिकॉप्टर, भक्तांची तंगडतोड
देशातील सर्वाधिक लांब पल्ल्याचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी मलंगगडच्या फ्युनिक्युलर ट्रेनची नोंद करण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाआधी नाशिक-वणीमधील सप्तशृंगी गड आणि विरार येथील जीवदानी देवीचे दर्शन घेण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रेनची सेवा सुरू झाली. तरी मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेनला मिंधे सरकारकडून हिरवा झेंडा मिळत नाही. एकनाथ शिंदे या गडावर हेलिकॉप्टरने पाच मिनिटांत पोहोचतात, परंतु लाखो भक्तांना धोकादायक वळणे पार करत तंगडतोड करावी लागत असल्याचा आरोपही स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
कोटय़वधींची सामग्री धूळ खात
गेल्या आठ वर्षांपासून मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प रखडला आहे. रोप, जनरेटर, ट्रॉली ओढणारी पुली, लोखंडी पूल हे साहित्य गेल्या दोन वर्षांपासून गडावर येऊन पडले असून ते अक्षरशः धूळखात पडले आहे. कोटय़वधी रुपयांची सामग्री खरेदी करूनही शिंदे पितापुत्रांच्या अनास्थेमुळे फ्युनिक्युलर ट्रेनचे साहित्य गंजून भंगारात जाईल की काय, अशी भीती अंबरनाथमधील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
फोडाफोडीपेक्षा ट्रॉलीचे काम आधी करा
शिवसेनेशी गद्दारी करून मुख्यमंत्री झाल्यानंतर मिंधे गटाने शिवसेनेच्या शाखा पाडणे, बळकावणे, शिवसैनिकांना गुन्हे दाखल करण्याचे धमकावत स्वतःच्या गटात ओढणे, गरीब शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची पोळीभाजी केंद्रे बंद करणे, दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमावर बेकायदा कब्जा करणे असे उद्योग सुरू केले आहेत. त्याऐवजी शिंदे यांनी मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रेन सुरू करावी, असा टोला शिवसैनिकांनी लगावला आहे.




























































