शाळेची इमारत पाहून मुलगा म्हणतोय ‘बाबा, हे मागच्या जन्मात कुठेतरी पाहिलंय’

गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे शाळा-कॉलेज बंद आहेत. मुले घरीच बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुलांना शाळेचा विसर पडला आहे. त्यातच एक गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून नेटकऱयांनाही हसू आवरता येत नाही. यात एक मुलगा चक्क शाळेची इमारत पाहून ‘बाबा, हे मागच्या जन्मात कुठेतरी पाहिलंय’ असे म्हणताना दिसत आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ झपाटय़ाने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत वडील आणि मुलगा कारमधून कुठेतरी बाहेर जाताना दिसतायत. वाटेत त्यांना शाळेची इमारत दिसते. मुलगा खिडकीतून आश्चर्याने त्या इमारतीकडे पाहत होता. तेव्हा वडिलांनी काय झालं असे त्याला विचारलं. त्यावर ‘बाबा, या इमारतीचं आणि माझं मागच्या जन्मीचं नातं आहे’, असं तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणताना दिसतोय. त्यावर वडिलांनी मुलाच्या कानशिलात लगावत ‘ही तुझी शाळा आहे’ अशी आठवण करून दिली. ‘कोरोनाला लवकर पराभूत करणे गरजेचे आहे. नाहीतर प्रकरण आणखी गंभीर होत जाईल’, अशी कॅप्शन दीपांशू काबरा यांनी व्हिडीओला दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या