
सध्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गाजत असलेल्या सीएमआर तांदूळ घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांचा स्थानिक सत्ताधाऱ्यांसोबत व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच सूत्रधारांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत फोटो काढून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता स्थानिक मंत्र्यांसोबत काढलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईच्या भीतीपोटी त्याच सत्ताधारी मंत्र्यांची मनधरणी सुरू केली असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सीएमआर तांदूळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत असून आरमोरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात सीएमआर तांदूळ भरडाई करणाऱ्या विशाल राईस मिलचा नित्कृष्ट दर्जाचा तांदूळ नागरिकांनी पकडून देऊन शासनाकडे कारवाईची मागणी केली होती. याच दरम्यान जनसंवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विशाल राईस मिल मालक पुरुषोत्तम डेंगाणी यांनी फोटो काढून हा फोटो समाज माध्यमात पोस्ट टाकून विरोधी पक्षनेते आपल्या सोबत असल्याचे चित्र उभे केले होते. त्यानंतर आता सत्ताधारी मंत्री या भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा दावा राईस मिलधारक करत आहेत. जिल्ह्यातील नित्कृष्ट दर्जाचा सीएमआर तांदूळ घोटाळ्याला सत्ताधारी मंत्र्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरमोरी तालुक्यात गत तीन महिन्यांपासून राशन दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वितरण करणे सुरू आहे. हा तांदूळ तीन ते चार वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार नवीन तांदळाचे वितरण करणे आवश्यक असताना नियमबाह्यपणे तांदूळ वितरित करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. जनावरेही तोंड लावणार नाहीत असा निकृष्ट तांदूळ वितरित केला जात असल्याचे गावकरी सांगत आहेत. आरमोरी तालुक्यातील जागृत नागरिकांनी प्रत्यक्ष तीन ते चार राशन दुकानात जाऊन चौकशी केले असता त्या दुकानात 75 टक्के तांदूळ हे कणीयुक्त (खडा) आढळून आलेले दिसून आले. याबाबत स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांनी विचारले असता सदर नित्कृष्ट दर्जाचे दर्जाचा तांदूळ शासनाच्या शासकीय गोदामातून आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या एकूण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.