मातीतले खेळ…खेळाला वयाचे बंधन नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळ तोरसकर

योग्य तो व्यायाम आणि प्रशिक्षकाचे मार्गदर्शन या दोन गोष्टींच्या जोरावर आपण कोणत्याही वयात खेळ खेळण्याचा आनंद घेऊ शकतो…

मागील लेखात आपण व्हॉलीबॉल खेळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच खेळाबद्दल अधिक विस्तृतपणाणे आता आपण जाणून घेऊया. जसे आपण जाणून घेतले की व्हॉलीबॉल हा अतिशय वेगवान, चपळ व बुद्धिकौशल्याला चालना देणारा व मजबूत शारीरिक क्षमता असलेला खेळ आहे. जर आपण खेळाडू म्हणून कोणताही खेळ खेळायचे ठरवले तर आपल्याला वयाची अडचण केंव्हाच येणार नाही. त्यामुळे आपण कोणताही खेळ कोणत्याही वयात खेळू शकतो; पण कदाचित योग्य वयात त्या –त्या खेळात पारंगत न झाल्यास आपण स्पर्धात्मक व व्यावसायिक खेळ खेळू शकणार नाहीत. मात्र आपण आपले शरीर फिट ठेवल्यास आपला आवडता खेळ कोणत्याही वयात खेळू शकू. आता व्हॉलीबॉलच घ्याना, हा खेळ खेळताना आपल्याला आपली शारीरिक क्षमता प्रचंड मोठी ठेवावी लागते. त्याचबरोबर आपल्या अंगी असलेल्या चपळतेला सुध्दा प्रचंड वाव द्यावा लागतो. क्षणात निर्णय घेण्यासाठी बुध्दिमता पणाला लावावी लागते व समोरच्या संघातील खेळाडू व आपले सहकारी यांचा विचार करता क्षणाक्षणाला घ्यावे लागणारे निर्णय आपले संघातील स्थान निच्छित करून जातो. हे सगळे जुळून आल्यास आपले नियोजन व त्याचा झालेला परिणाम आपल्याला गुणांच्या आधारे आपल्याला दिसून येतो व हा खेळ किती सोपा आहे हे सुध्दा जाणवते.

जर आपण उत्कृष्ट खेळाडू होण्याचे ठरवले असेल तर मात्र आपल्याला काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात. त्यात सर्वात आधी आपली शारीरिक क्षमता. त्यासाठी आपणास नियमित व्यायामची गरज असते. त्यामुळे खेळ सुरू होण्यापूर्वी आपल्या शरीराचे स्नायू नक्कीच मोकळे करणे आवश्यक असते. त्यामुळे व्हॉलीबॉल खेळताना जर एखाद वेळी अचानक ताण पडला तर आपले शरीर व आपले अवयव हा ताण सहज सहन करू शकतात व त्यामुळे लचक भरण्याचा संभव राहत नाही. आपण नेहमीच एक काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे व्यायामास सुरवात (नवखे असताना) करताना एखाद्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावा त्यामुळे आपण एखादी चूक करत असू तर मात्र त्यावेळी हे प्रशिक्षक आपल्या मदतीला नक्कीच धावून येतील व योग्य व्यायाम आपल्याकडून होतोय की नाही याकडेही ते लक्ष देतील. व्यायाम करताना कोणत्या अवयवापासून प्रथम सुरुवात करावी व शेवटी कोणता व्यायाम करावा याकडेही ते लक्ष देवू शकतील. ज्याप्रमाणे घराचा पाया भक्कम असावा लागतो तसेच व्हॉलीबॉल खेळताना सुध्दा सर्वात आधी ज्या भागावर आपले शरीर उभे राहते ते आपले पाय भक्कम करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच व्यायामची सुरुवात करताना पायापासून करावी व त्यानंतर गुडघे, त्यानंतर कंबर, त्यानंतर हात, त्यानंतर पाठ, त्यानंतर मान असा क्रमाक्रमाने व्यायाम करावा व आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे.

यात वेगेवेगळे व्यायाम करताना व्हॉलीबॉल साठी काही विशेष व्यायाम प्रकारावर लक्ष देऊया. जागच्या जागेवर गुडघे समोर वर उचलून धावणे सुरवातीला हळू हळू व नंतर जोराने व शेवटी पुन्हा हळू हळू असा व्यायाम पायांना मिळाल्याने आपले पाय मजबूत होतील, टाचा वर-खाली करत पायच्या पोटर्यांना व्यायाम द्यावा, जोर-बैठका माराव्यात, कमरेत हाताच्या दोन्ही बाजूला वाकून हाबके द्यावेत तसेच पुढे व मागे सुध्दा हाबके द्यावेत, दोन्ही हात 180 अंशात वर करून कंबर दोन्ही बाजूला हलवावी / वळवावी, दोन्ही हात 180 अंशात वर करून खांद्यातून पिढे व मागे फिरवावेत, तसेच मनगट सुध्दा पुढे मागे फिरवावे, दोन्ही हात 180 अंशात वर करून हात कोपरत दुमडून हाताचा पंजा खांद्यावर ठेवत पुढे व मागे गोलाकार फिरवावेत. असे वेगवेगळे व्यायाम करत आपली तंदुरुस्ती कायम ठेवल्याने मग हा खेळ खेळताना स्त्री असो वा पुरुष कोणालाही त्रास होणार नाही.

व्हॉलीबॉलच्या सामन्यावर देखरेख ठावण्यावर पंचप्रमुख, पंच, गुणलेखक, रेषा अधिकारी आदि लोक काम पहातात. व्हॉलीबॉल कोर्टच्या रेषा या मापाच्या आत असल्याने रेषेवर पडणारा चेंडू हा कोर्टातच धरला जातो. या सामन्यात गुणलेखक हा पंचप्रमुखच्या समोरील बाजूस बसतो त्याने झालेले गुण नोंदवणे व ते मोठया आवाजात सांगण्याचे महत्वाचे असते. खेळाडूंची नोंद ठेवणे, गडी बदलाची नोंद करणे व विश्रांतीचा काळ नोंदणे, खेळाडूवर केलेली कार्यवाही आदिचा तपशील नोंद करणे. अंतिम निकाल करणे व तो पंचप्रमुखांना दाखवणे.