
उज्जैनचे ओमप्रकाश गुप्ता लहानपणापासून गणरायाचे भक्त आहेत. या भक्तीतून त्यांना गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला आहे. 75 वर्षीय गुप्ता यांनी देशभरात फिरून हजारो गणेशमूर्ती जमवल्या आहेत. आज त्यांच्या संग्रहात पाच हजारांहून अधिक मूर्ती आहेत. गुप्ता यांनी राहत्या घरातच गणेश म्युझियम साकारले आहे. म्युझियम बघण्यासाठी लोक दूरवरून त्यांच्या घरी येतात.
ओमप्रकाश गुप्ता यांनी माती, लाकडी, पितळी, चांदी, रेडियम, स्फटिक यांच्या मूर्ती जमा केल्या आहेत. गुप्ता सांगतात, ज्या वयात मुले खेळणी मागतात त्या वयात मी गणेशमूर्तींचा हट्ट करायचो. वेगवेगळ्या शहरात जाऊन, चारधाम यात्रा करून तसेच नेपाळ, इंदूर, ओंकारेश्वर, टिकमगढसह अनेक शहरांतून मूर्ती आणल्या आहेत. 14 बाय 18 फूट आकाराच्या खोलीचे रूपांतर म्युझियमध्ये केलेय. दर महिन्याला तीन ते चार मूर्ती घेऊन येतो.





























































