गोव्यातील गणपती

bappa

>> फुलोरा टीम

कोकणाप्रमाणे गोव्यातदेखील गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. कोकणाप्रमाणे गोव्यात देखील घरगुती गणपती मोठय़ा भक्तिभावाने पुजला जातो. गोव्यात गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. इथल्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्टय़े आहेत.

गोव्याच्या वेगवेगळ्या समाजात पर्यावरणीय गणपती पुजण्याची ही परंपरा इथल्या लोकमनात असलेल्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवते. याचप्रमाणे काही वैशिष्टय़पूर्ण गणेशही आहेत.

माशेलचे देखावे
गणेशोत्सवात उभारल्या जाणाऱया आकर्षक देखाव्यांसाठी माशेल राज्यात प्रसिद्ध आहे. दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर या देखाव्यांना सुरुवात होते. 2001 मध्ये माशेल येथील साई कला मंडळाने नारळांपासून भव्य अशी गणेशाची मूर्ती साकारली होती. या मूर्तीची चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर माशेल तसेच शेजारील कुंभारजुवे व खांडोळा भागात आकर्षक अशा गणेश कलाकृती करण्याची परंपरा सुरू झाली. अनेक गणेश मंडळे त्यासाठी पुढाकार घेत दरवर्षी वेगवेगळ्या कलाकृतींची निर्मिती सातत्याने करत आहेत. काही वर्षांपूर्वी नार्वेकर ब्रदर्सनी अळंब्यांपासून साकारलेला गणराया आणि विठ्ठल सांस्कृतिक मंडळाने श्री स्वामी समर्थांच्या रूपातील साकारलेली गणेशमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र होती. माटोळीत वापरल्या जाणाऱया वस्तूंपासून नावेलकर बंधूंनी उभारलेल्या गणेशाच्या मूर्तीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. केळीच्या पानापासून तयार केलेली गणेशमूर्ती आणि त्यातील पिटुकला उंदीर सगळ्यांची दाद मिळवून गेला होता. गणरायाचे विराट रूपदेखील भाविकांच्या पसंतीस उतरले होते. 14 ते 15 लहान गणेशमूर्तींचा वापर करून उभारलेली गणेशाची मूर्ती आजही अनेकांना आठवते. एका वर्षी निरनिराळ्या भाज्यांपासूनही आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. दरवर्षी माशेल, कुंभारजुवे आणि खांडोळा भागात 30 ते 35 आकर्षक गणेशमूर्ती भव्य स्वरूपात साकारल्या जातात.

कोरगावचा राजा चौपाटीतला गणपती
गोव्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील शेटय़े कुटुंबाचा चौपाटीतला गणपती राज्यात प्रसिद्ध आहे. चौपाटीतील शेटय़े कुटुंबातील सदस्यांची संख्या दीड हजाराचा आकडा पार करूनही आजवर कोणीही स्वतंत्रपणे चतुर्थीत गणपती पूजन करत नाही. शेटय़े यांच्या गणपतीची आणखीही वैशिष्टय़े आहेत. साधारणपणे या गणपतीची मूर्ती 9 ते 10 फूट असते. चतुर्थीच्या दिवशी मूर्तिकार गणपतीची नजर उघडतात तो सोहळा पाहण्यासारखा असतो. राज्यात इतरत्र अशी परंपरा कुठेही पाहायला मिळत नाही. पेठेचावाडा-कोरगाव येथील पाच शेटय़े कुटुंबीयांपैकी इच्छेट घराणे महत्त्वाचे मानले जाते. इच्छेट घराण्याचा हा गणपती एखाद्या राजघराण्यात पुजला जावा असा पूजला जातो. चौपाटीतील या महागणपतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही मूर्ती मातीच्या 12 गोळ्यांपासून तयार केली जाते. मातीचे 12 गोळे म्हणजे गणपतीला नैवेद्य घेऊन येणारी 12 कुटुंबे, असे मानले जाते. गणरायाची नजर उघडल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने परिसर दुमदुमून जातो. पुढे पाच दिवस हा उत्साहाने ओसंडून वाहणारा उत्सव सर्व शेटय़े कुटुंबीय साजरा करतात. या महागणपतीसाठी केली जाणारी सजावटही डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. गोव्यात अशा पद्धतीने साजरा होणारा हा एकमेव गणेशोत्सव आहे. दरवर्षी शेटय़े कुटुंबीयांना एकत्र आणून त्यांच्याकडून सेवा करून घेणाऱया या कोरगावच्या राजाच्या स्वागतासाठी सर्व गणेशभक्त यंदाही सज्ज झाले आहेत

तिसऱया दिवशी विसर्जन
काणकोणच्या तुडल-गावडोंगरी येथील काही कुटुंबात वेगळ्या पद्धतीने चवथ साजरी केली जाते. अन्यत्र गणपती विसर्जन दुसऱया दिवशी करतात व तिसरा दिवस ‘कर’ म्हणून पाळतात. मात्र तुडल वाडय़ावर तिसऱया दिवशी गणपती विसर्जन केले जाते. चतुर्थीच्या दुसऱया दिवशी घरातील पुरुषमंडळी खुंटी जोगवणे नावाचा विधी करतात. त्या दिवशी कोंबडा कापला जातो. घरातील पुरुष मातीचा गाडगा व शिसवीच्या कामटय़ा घेऊन परंपरागत चालत आलेल्या विधीनुसार ओहोळावर जातात. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नावे एक चूल तयार केलेली असते. आपापल्या चुलीवर मातीच्या गाडग्यात भात शिजवून तो पानावर वाढून ठेवतात. त्यानंतर मागे वळून न पाहता ती मंडळी घरी येतात. हा सर्व विधी सुरू असताना मौन पाळले जाते. पंचमीच्या रात्री गणपतीला आरती आणि नैवेद्य नसतो. या वाडय़ावर इतरांप्रमाणेच चवथीच्या दिवशी मूर्ती आणली जाते, मात्र विसर्जन तिसऱया दिवशी केली जाते. ही प्रथा कित्येक पिढय़ांपासून अशीच चालू आहे.

चितारी समाजाच्या पाटांना मागणी
गणेश चतुर्थी आली की देमानी-कुंकळ्ळी येथील चितारी व च्यारी समाज गणेश चतुर्थीसाठी लागणाऱया पाटांची निर्मिती करायला सुरुवात करतो. राज्यभरातील गणेशभक्तांकडून येथील पाटांना मागणी आहे. पाटांवरील कोरीव काम आणि आकर्षक रंगसंगतीमुळे गणेशभक्त कुंकळ्ळीतील चितारी समाज बनवत असलेल्या पाटांना नेहमीच पसंती देतात. देमानी-कुंकळ्ळी गावात च्यारी आणि चितारी समाजाची वस्ती आहे. तिथे अनेक प्रकारचे लाकडावरील कोरीव काम केले जाते. देमानीचे मेस्त म्हणून प्रसिद्ध असलेले च्यारी आणि चितारी समाजातील लोक पूर्वी ठिकठिकाणच्या जत्रोत्सवात पाट व इतर लाकडी साहित्य घेऊन जात असत. गणेश चतुर्थीच्या काळात लाकडी पाट आणि माटोळी सामानाला बऱयापैकी मागणी असते. ही मागणी पूर्ण करून या व्यवसायातील च्यारी आणि चितारी समाजाची मंडळी बऱयापैकी उत्पन्न करतात. सध्या माटोळीचे सामान 600 ते 1 हजार रुपयांना तर पाट 1 हजार ते 4 हजार रुपयांपर्यंत विकला जातो.

काणकोणातील आगळावेगळा गणेशोत्सव
काळ, ऋतुमान आणि हवामानाच्या बदलानुसार आपल्याकडे सण साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे गोंयची चवथ हा कृषी संस्कृतीमधील कष्टकरी माणसांचा सृजनउत्सव आहे. गोव्याची चवथ हा एक आनंदानुभव असतो. मातीच्या भिंतींना मातीचाच रंग देण्याचे काम चतुर्थीपूर्वी केले जाते. झाडलोट आणि आवराआवर करून खास ठेवणीतील माडीवर किंवा देवाच्या खोलीत ठेवलेली भांडी काढून पूजेसाठी सज्ज केली जातात. गावातील भाटातील नारळ काढून घेतले जातात. काणकोण तालुक्यातील बोरूस-लोलये येथील बोरुसकर घराण्याचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागेल. गणेशोत्सवासाठी 10 गोळ्यांची भव्य आणि आकर्षक मूर्ती पूर्वी बनवली जायची. ही मूर्ती उचलून आणणे कठीण होत असल्यामुळे देव्हाऱयात याच पद्धतीने ज्या ठिकाणी गणपती पुजला जातो त्या ठिकाणी मूर्ती बनवली जाते.

गोळ्यांचा भव्य गणपती
पैंगीणच्या फळदेसाई कुटुंबीयांची चवथदेखील बोरूसकर कुटुंबीयांसारखीच आहे. फळदेसाई कुटुंबाच्या भव्य वाडय़ावर पूर्वी 10 गोळ्यांची मूर्ती बनवली जायची. दहा जणांनी एक-एक गोळा आणायचा. त्यानंतर वाडय़ावरच मूर्ती बनवली जायची. विसर्जनाच्या वेळी दहा जणांना खांदा द्यावा लागायचा. आताही याच फरकाने उत्सव साजरा करत चतुर्थीला एकत्र जमून मूर्ती बनवली जाते.

कुंभारजुवेचा सांगोडोत्सव
कुंभारजुवेच्या सांगोडोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानिमित्त हा सांगोडोत्सव सुरू झाला आहे. शेकडो वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी आरंभलेल्या बाटाबाटीवेळी मूळ कुमरसमे, खोर्ली-तिसवाडी येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरणीची मूर्ती तेथील एका युवकाने सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी स्वीकारली. त्या दिवसापासून माशेल येथील श्री शांतादुर्गा देऊळवाडा येथे त्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. काही वर्षांनी कुंभारजुवे येथील प्रसिद्ध वाडीये कुटुंबातील लोकांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती माशेल येथील श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवळात आणून ठेवली. या वाडीये कुटुंबात आजदेखील गणेशमूर्ती पुजली जात नाही, मात्र दरवर्षी तिथे सात दिवसांच्या गणपतीचे पूजन केले जाते. या गणपतीचे विसर्जन अनोख्या अशा सांगोडोत्सवाने केले जाते. सनईचौघडय़ाच्या वादनात श्रींची मूर्ती माशेल-तारीवाडय़ावर पोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सांगोडात ठेवली जाते. देवीचा सांगोड प्रथम मार्गस्थ केला जातो. त्यानंतर सांगोडोत्सवाला सुरुवात होते. या सांगोडोत्सवात चिंचवाडा येथील शंखासूर, सुभद्रा, वेताळ व भाविकादेवी ही सोंगे सांगडावर घेतली जातात.