बाप्पाच्या दरबारात प्लॅस्टिकविरोधात जागर, गणेश मंडळे करणार जनजागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बाप्पाच्या दरबारात येणाऱ्या गणेशभक्तांना या वर्षी प्लॅस्टिकविरोधात धडे मिळणार आहेत. यामध्ये मंडपात एलईडी स्क्रीनवर प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणि पर्यावरणावर होणारे घातक परिणाम दाखविण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून मंडळांना माहितीपूर्ण ‘सीडी’ देण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अनेक बड्या मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्लॅस्टिकविरोधात जनजागृती करण्याची हमी दिली आहे.

राज्यभरात 23 जूनपासून प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेकडून मुंबईभरात प्लॅस्टिकविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. तरीदेखील काही ठिकाणी अजूनही प्लॅस्टिकचा वापर होत आहे. या पार्श्वभूमीवर कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या लाखो भक्तांना प्लॅस्टिकचे दुष्परिणाम ‘दृकश्राव्य’ माध्यमातून पटवून देण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून मुंबईतील अनेक बड्या मंडळांना उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी आवाहनाचे पत्रही दिले होते.

अशी होणार जनजागृती
पालिकेकडून मंडळांना देण्यात येणाऱया ‘सीडी’मध्ये प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात येईल.
यामध्ये फलक, घोषवाक्य, व्हिडीओ, पर्यावरणावर झालेले दुष्परिणाम, प्लॅस्टिकला असणारे पर्याय दाखवण्यात येतील.

पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या प्लॅस्टिकला हद्दपार करायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. या पार्श्वभूमीवर व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवात मोठय़ा संख्येने भक्तगण एकत्र येत असल्याने मंडळांनी प्लॅस्टिकविरोधात केलेली जनजागृती प्रभावी ठरणार आहे.
-निधी चौधरी, उपायुक्त (विशेष)

summary– ganeshotsav mandals create awareness about plastic ban