
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण मध्ये दिवसाढवळ्या झालेल्या घरोफडीचा तपास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने करताना पेण येथे चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ८,१८,३७०/- रु. किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे.
दि. ५ जूनरोजी चिपळूण परिसरामध्ये घडलेल्या दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्हयाच्या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी लक्ष केंद्रीत केले. सदरचा गुन्हा करताना अज्ञात आरोपीत यांनी वाहनाचा वापर केल्याचे व सदरचे वाहन काही स्थानिक लोकांनी पाहीलेले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरुन सदरची गाडी ही काळया रंगाची होंडा सिटी व तिचा क्रमांक एम.एच.०१ पासून सुरु होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. यावरुन सदरचे गुन्हेगार हे मुंबई/ठाणे परीसरातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक रायगड, ठाणे, मुंबई या परिसरात पाठविण्यात आले. सदरचे पथक हे मुंबई येथे जात असताना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे पेण जिल्हा रायगड या ठिकाणी हॉटेल हिमगौरी नजीक मोकळया जागेमध्ये एक काळया रंगाची होंडा सिटी गाडी क्रमांक एम.एच.०१-ए.एच.५८६४ ही निदर्शनास आली.
सदर गाडीमध्ये काही इमस बसल्याचे दिसत होते. काही अंतरावरून त्या गाडीवर वॉच ठेवण्यात आला. गाडीतील इसमांच्या हालचाली संशयास्पदरित्या दिसून आल्याने वाहनाची झडती घेतली. त्यावेळी त्यांना ड्रायव्हर सिटच्या खाली स्क्रु ड्रायव्हर, अॅडजेस्टेबल पाना, कटावणी इत्यादी हत्यारे दिसून आली. तसेच गाडीमध्ये एक स्टील डबा व त्यामध्ये सोन्याचे दागिने सापडले. दागिने व हत्यारांबाबत त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून माहीती सांगण्यास टाळाटाळ केली.
अधिक चौकशीमध्ये त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ज्ञानेश्वर अप्पादुराई शेट्टी वय ३५ रा.गणराज पॅलेस, रुम नं. ४०१ दिवा जि.ठाणे मुळ रा.तामिळनाडू, नासिर खान इसाक खान पठाण वय ३९ रा.रुम नं. १, नाझीया मंजील, नरीमल नगर, जालना, मुकेश भागोजी बाळसराफ वय ३४ रा.आंबीवली, नवनाथ कॉलनी, माणी ता.कल्याण, जि.ठाणे, मुळ रा.जुन्नर, पुणे, रवी रामचंद्र शेट्टीयार वय ३४ रा.वागळे इस्टेट रोड, रुम नं. १६, शिवशक्ती नगर,गल्ली नंबर २, जि.ठाणे, मुळ रा.तामिळनाडू यांना दिनांक १२/०७/२०१८ रोजी अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींकडून होंडा सिटी गाडी क्रमांक एम.एच.०१-ए.एच.५८६४ सह १ सोन्याचे मंगळसुत्र, अंगठी, २ पेंडल, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ८,१८,३७०/- रु. किंमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपींनी भिंवडी ते अंबाडी या परिसरामध्ये दिवसा घरफोडी चोरी केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये सांगितलेले आहे.
या टोळीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी गुन्हे केल्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, हेड कॉ. संजय कांबळे, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, विजय आंबेकर, रमिज शेख, चालक दत्ता कांबळे यांनी केलेली आहे.





























































