
राधानगरी तालुक्यातील गवशी येथील शेतकऱयांनी धामणी नदीवर सिंचनासाठी घातलेला बंधारा आज सकाळी फुटला. यामुळे शेकडो एकर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 1 डिसेंबरपासून पाटबंधारे विभागाने नदीपात्रातील पाणी उपसा बंदी केल्यामुळे पाण्याचा दाब वाढला आणि बंधारा फुटल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. दरम्यान, या बंधाऱयातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे पणोरे व अंबर्डे येथील बंधाऱयांनाही धोका निर्माण झाला आहे.
धामणी नदीकाठच्या सर्व गावांतील चौकेपासून अंबर्डेपर्यंतच्या शेतकऱयांनी एकत्र येऊन लाखो रुपयांची पदरमोड करून दरवर्षी ठिकठिकाणी मातीचे बंधारे घालत असतात. चालूवर्षीसुद्धा असेच मातीचे बंधारे घातले होते. गवशी-बळपवाडी दरम्यानच्या येथे घातलेल्या मातीच्या बंधाऱयावर पाण्याचा दाब वाढल्यामुळे हा बंधारा फुटला. या बंधाऱयात अर्ध्या टीएमसीहून अधिक पाणी साठवले होते. यातील पाण्यावर गवशी, पाटीलवाडी व भित्तमवाडी येथील शेकडो एकर जमीन सिंचनाखाली आली होती. मात्र, हा बंधारा पाण्याच्या दाबामुळे फुटल्यामुळे शेकडो एकर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बंधाऱयातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे नदीकाठची जमीन खचून 12 शेतकऱयांच्या पाणी उपसा पंपांचे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागासह महावितरणने नदीपात्रातील पाणी उपसा बंदी केल्यामुळे पाण्याचा दाब वाढला आणि बंधारा फुटल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे.
धामणी नदीवर उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळावे, यासाठी स्थानिक शेतकरी ठिकठिकाणी नदीपात्रात मातीचे बांध घालतात. यातील बळपवाडी व पात्रेवाडीमधील धामणी नदीतील मातीचा छोटा बांध आज सकाळी फुटला आहे. नदीतील बंधारा फुटल्याने यातून बाहेर पडणारे पाणी धामणी नदीपात्राच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी घाबरू नये व अफवांवर विश्वास ठेऊ नये. नदीतील असे बांध जलसंपदा विभागाकडून घातले जात नाहीत. हा बांध दरवर्षी पेक्षा जास्त उंचीचा घातला असण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने धामणी नदीवर असणारे अंबर्डे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयापर्यंत सर्व बंधाऱयांमध्ये पाणीसाठा योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी 2 ते 4 डिसेंबर या तीन दिवसांसाठी
संपूर्ण धामणी नदीवर उपसाबंदी लागू केली
होती; परंतु या कालावधीत अंबर्डे बांधाऱयापर्यंत पाणी आले नव्हते, त्यामुळे या बाबींचा बांध फुटण्याशी संबंध नाही.
– रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.


























































