सीआयएसएफच्या गीता समोताने सर केला माऊंट एल्बर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

5 हजार 642 मीटर उंच, उणे 20 अंश सेल्सियस डिग्री तापमान, वातावरण बदलाने अचानक झालेली हिमवृष्टीत माघार न घेता रशियातील सर्वात मोठे पर्वत माऊंट एल्बर्स हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) च्या महिला अधिकारीने सर केले आहे. गीता समोता असे त्या महिला अधिकारीचे नाव असून माऊंट एल्बर्स सर करणाऱया त्या निम लष्करी तुकडीतील पहिल्याच अधिकारी आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र काwतुक होत आहे.

गीता या मूळच्या राजस्थानच्या रहिवासी आहेत. लहानपणापासूनच गीता यांनी लष्करात रुजू होण्याचे स्वप्न पाहिले होते. अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या दहा वर्षांपूर्वी सीआयएसएफमध्ये रुजू झाल्या.

सीआयएसएफमध्ये रुजू झाल्यानंतर काहीतरी वेगळे करायचे यासाठी त्याची धडपड सुरू झाली. घर आणि नोकरी यावर न थांबता आजच्या पिढीतील महिलांना एक आदर्श निर्माण व्हावा या हेतूने त्यांनी पर्वत सर करण्याचे मनाशी ठरवले.

2015 मध्ये इंडो-तिबेटियनच्या माध्यमातून राबवला जाणारा बेसिक माऊंटेनिंगचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. अडचणीशी दोन हात करत आलेल्या अनुभवाची शिदोरी घेऊन माऊंट एल्बर्स पार करण्याचे त्यांनी मनाशी ठरवले. एव्हरेस्ट सर करताना आलेले अनुभव लक्षात घेऊन गीता यांनी माऊंट एल्बर्स सर करण्यासाठी सराव सुरू केला. ऑगस्ट महिन्यात त्या स्वखर्चाने रशियाला गेल्या. उणे 20 डिग्री सेल्सियस तापमान आणि अचानक होणाऱया बर्फवृष्टीत काय करावे याचे नियोजन केले. जिद्दीच्या जोरावर त्यांनी माऊंट एल्बर्सवर जाण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या बर्फवृष्टीत न डगमगता अवघ्या पाच दिवसांत गीता यांनी माऊंट एल्बर्स पार केले.