जिओ टॅगिंग केलेलं दुर्मिळ प्रजातीचं कासव बेपत्ता, संशोधकांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवळपास 2700 किमी इतका समुद्रप्रवास करणारं एक दुर्मिळ प्रजातीचं कासव बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. संशोधकांनी या कासवाला जिओटॅगिंग केलं होतं. तसंच या कासवासोबत एक ट्रान्समीटर बसवण्यात आला होता. त्या ट्रान्समीटरवरून सिग्नल येणं बंद झालं आहे.

या कासवाचं नाव प्रथमा असं आहे. ती ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ होत चाललेल्या समुद्री कासव प्रजातीची मादी आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास इथल्या किनाऱ्यावरून ती 25 जानेवारी 2022 रोजी समुद्रात शिरली होती.

तिने तिथून समुद्र मार्गाने गुजरात गाठलं. गुजरातच्या दिशेने वळण्यापूर्वी तिने दाभोळ येथील खाडीत काही काळ मुक्काम केला होता. दिव येथील समुद्र किनाऱ्यावर काही काळ घालवून ती पुन्हा परत फिरली आणि महाराष्ट्राजवळील समुद्रात आली.

या दरम्यान तिला बसवलेल्या ट्रान्समीटरवरून उपग्रहाद्वारे तिच्या प्रवासाचे तपशील संशोधकांना मिळत होते. 24 मे पासून तिच्या ट्रान्समीटरवरून संदेश येणं बंद झालं आहे. तिचा संदेश मिळणं थांबण्यापूर्वीचा मुक्काम हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यापासून 60 किमी अंतरावरील समुद्रात असल्याची माहिती मिळाली होती.

तिच्या फिरण्याच्या पद्धतीनुसार ती दक्षिणेकडील समुद्रात फिरत असावी असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता संशोधकांनी फेटाळून लावली आहे. ती बेपत्ता होण्यामागचं खरं कारण ट्रान्समीटरमधील बिघाड असू शकतो. कारण, ती मृत्यू पावली असती तरीही ट्रान्समीटर सिग्नल पाठवत राहिला असता. जर तो सिग्नल पाठवत नसेल तर नक्कीच त्यात बिघाड झाला आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.