
‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित शिवसैनिकांची फौज मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्माण करावी लागेल. शिवसैनिकांच्या जीवावर निवडून येऊन बंडखोरी करणाऱयांना ‘शिवसेना’ या चार अक्षरांची किमया दाखवावीच लागेल,’ असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 मधील पदाधिकाऱयांची महत्त्वाची बैठक ‘मातोश्री’ निवासस्थानी पार पडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी गटप्रमुख, शिवसैनिकांच्या प्रभागनिहाय बैठका आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईकर जनतेसाठी शिवसेनेने केलेल्या लोककल्याणकारी कामांची माहिती घरोघर पोहोचवा, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी सर्वच बाबतीत आपण सक्षम असून न्यायालय आणि कायद्याविषयी चिंता करू नका, असे पदाधिकाऱयांना सांगितले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ‘साहेब, फक्त आदेश द्या, बाकी सर्व आमच्यावर सोपवा’ असे आश्वासन दिले. याप्रसंगी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी विभागाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना विठ्ठल-रुक्मिणीची आकर्षक मूर्ती भेट दिली. शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, राजकुमार बाफना, विभाग संघटक जयश्री बाळ्ळीकर, ज्येष्ठ शिवसैनिक व नाटय़कर्मी अशोक मुळ्ये आदी उपस्थित होते.


























































