ड्रग्ज पेडलर्ससह कफसिरप, गांजाचा साठा पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने शिवाजीनगर, देवनार परिसरात धडक कारवाया केल्या. दोन वेगवेगळ्या कारवायांत आठ ड्रग्ज तस्करांना पकडून लाखो रुपयांच्या कफसिरपच्या बाटल्या आणि गांजाचा साठा पकडला.

घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंशाक शेळके, उपनिरीक्षक चारू चव्हाण, बोबडे व पथक विक्रोळी परिसरात गस्त घालत असताना टागोरनगर परिसरात दोन तरुण संशयास्पद हालचाल करताना सापडले. तसेच त्यांनी आणलेली ओमनी कार देखील होती. एकाच्या हातातील बॅगची तपासणी केली असता त्यात कफसिरपच्या 250 बाटल्या मिळाल्या, तर ओमनी टॅक्सीमध्ये चार गोण्यांत लपवून ठेवलेल्या 1180 कफसिरपच्या बाटल्या सापडल्या. मग पथकाने मोहम्मद ओवेस अब्दुल खालिद अन्सारी आणि तौसिफ नसीम खान या दोघांना अटक करून त्यांनी नशेबाजांना देण्यासाठी आणलेला 1430 कफसिरप बाटल्यांचा साठा आणि ओमनी टॅक्सी असा चार लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दरम्यान, याआधी घाटकोपर युनिटनेच शिवाजीनगर परिसरातून सहा ड्रग्ज पेडलर्सना रंगेहाथ पकडले होते. तेव्हा त्यांच्याकडे दोन किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 305 कफसिरपच्या बाटल्या मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी एक लाख नऊ हजारांचा ड्रग्जचा साठा जप्त करून सुलतान सोहेल सय्यद, माजिद सदाफुल शेख, मुसावर मिस्किल खान, अब्दुल कादिर अशिकाली इद्रिसी, इम्रान जावेद शेख, वासिम तव्वाब दर्जी या सहा पेडलर्सना अटक केली होती.