घाटकोपरमधील पाणी समस्या महिनाभरात सुटणार, हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर पश्चिममध्ये असलेल्या वर्षानगर, रामनगर, भीमनगर आणि कातोडीपाडा येथील पाण्याच्या टाक्यांचा जटील झालेला प्रश्न महिनाभरात सोडवण्यात येणार असून त्यामुळे हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर दालनात झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

घाटकोपरमधील वर्षानगर, रामनगर, भीमनगर आणि कातोडीपाडा येथे 30 वर्षांर्प्वी बांधण्यात आलेल्या पाण्याच्या चार टाक्या जुन्या झाल्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांवर या परिसरातील 11 हजार 200 कुटुंबे अवलंबून असून ती सर्व इथूनच पाणी भरत आहेत, मात्र या टाक्या जुन्या झाल्यामुळे त्या टाक्या महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, त्यांचे जुने झालेले पंप बदलावेत, 20 ते 50 जणांसाठी पाण्याचे स्वतंत्र मीटर बसवण्यात यावे त्याचबरोबर थकबाकीसहित चालू बिल महापालिकेनेच वसूल करावे व प्रत्येक कुटुंबाला परवडेल अशा रितीनेच थकबाकी आकारणी करावी अशा अनेक मुद्दय़ांवर महापौर दालनात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. बैठकीला विभागप्रमुख राजेंद्र राऊत, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, नगरसेवक सुरेश पाटील, चारही पाणी टाक्यांसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष व संबंधित महापालिका अधिकारी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, मुख्य जल अभियंता अजय राठोर, आरसे उपस्थित होते.