हिमाचलच्या दुर्घटनेत गिरगावचे वास्तुशास्त्रज्ञ कुमार वेदपाठक यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पॉइंटवर पोहोचणारच होतो तर दगड कोसळू लागले होते… सांगला घाटीत सुरक्षेसाठी आम्ही गाडी मागे घेतली… पण काही क्षणातच मोठी दरड कोसळली… 10-15 टनाचा दगड घरंगळत आमच्या गाडीवर पडला आणि गाडी अडीचशे मीटर खाली दरीत कोसळली… 11 पैकी फक्त दोघेच वाचलो… 9 सहकारी जागीच गेले…पंजाबचा नवीन उपाध्याय काळजावर दगड ठेवून थरथरत माहिती देत होता. ती ऐकून गिरगावचे मिलिंद वेदपाठक यांना धक्काच बसला. त्या दुर्घटनेत त्यांचे चुलतबंधू व प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ कुमार वेदपाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिह्यातील सांगला-चिटकुल येथे दरड कोसळल्याची ही भीषण घटना रविवारी घडली. भगवान शंकराचे भक्त असलेले 37 वर्षीय कुमार वेदपाठक यांना तीर्थयात्रेची आवड होती. चार दिवसांपूर्वी ते दिल्लीच्या नोएडा येथे आपल्या बहिणीकडे गेले होते. तिथून नंतर एका टूरमधून कुलू-मनालीला पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्या मिनी बसमध्ये चालकासह 11 पर्यटक होते. त्यात पंजाबच्या मोहालीचा नवीन उपाध्याय हासुद्धा होता. सांगला घाटीवरील एका पॉइंटकडे ते चालले होते. त्याचवेळी दरड कोसळली. उपाध्यायसह अन्य एकजण या दुर्घटनेत सुदैवाने बचावले.

मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह दिल्ली येथे पाठवण्यात आले असून तिथून त्यांच्या राज्यांमध्ये पाठवले जाणार आहेत. कुमार यांचे पार्थिव मुंबईत त्यांच्या राहत्या घरी आणण्यासाठी शिवसेनेने सहकार्य केले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यासाठी सर्वतोपरी मदत केली असल्याचे मिलिंद वेदपाठक यांनी सांगितले.