
>> अॅड. गिरीश राऊत
केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तन आणि अविचारी विकास प्रकल्पांमुळे बुडत आहेत. नागपुरातही तेच घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला मुंबई, त्यानंतर २८ ऑगस्टला न्यू ऑर्लिन्स व त्यापाठोपाठ शांघाय २००५मध्ये बुडाले. या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खूप हाल होत आहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने त्याची व्याप्ती वाढते व मुंबईपासून दूर असलेल्यांनादेखील त्याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.
मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखडय़ातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल. मात्र मुंबईच्या काँक्रिटीकरणामुळे हे गृहीत मोडले गेले आहे. १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की, मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० टक्के काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो. १९६४च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, क्रीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी, परंतु १९९१चा अहवाल म्हणतो की, मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०.०३ एकर एवढेच उरले आहे. त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.
मुंबई सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. १७८४ सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणाऱया सागरातील पहिल्या भरावाचे (रेसकोर्सपासून पायधुणीपर्यंत) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती. या प्रत्येक भरावात आणि व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. त्याचबरोबर महापुराकडे वाटचाल होत राहिली.
मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनिस्सारण यंत्रणा १९३० व ४०च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या पाणी बाहेर सोडणाऱया मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठय़ा भरतीच्या पाण्याची रेषा होती. तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते, परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पुराच्या दिशेने वाटचाल झाली. उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती, नरीमन पॉइंट, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव, वांद्रे – कुर्ला संकुल इत्यादी भराव. यातील शेवटच्या वांद्रे – वरळी सागरी पुलाच्या मिठी नदीला गाडणाऱया, सागरात जाण्यापासून अडवणाऱया भरावाने व खांबांनी मुंबईसाठी एका मोठय़ा दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे. काँक्रिटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरत्यांना नाहक दोष दिला जात आहे. २६ जुलै २००५ रोजी महापुराच्या वेळी सायंकाळी दुपारी साधारण साडेतीन वाजेपासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत मोठी ओहोटी होती, भरती नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
उत्तरेकडील बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तिन्ही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासून ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळपर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या तीन खाडी टेकडय़ांपासून ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज, सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतून माहीमच्या खाडीत येते. या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव (त्यापैकी सुमारे ७०० एकर मॅन्ग्रोव्ह गाडून) करून नष्ट केली गेली. तिथून ते पाणी माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम कॉजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱया प्रभादेवी, दादर – शिवाजी पार्क, माहीम व वांद्रे भागातील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागातून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला सी लिंक प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.
केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे बुडत आहेत. नागपुरातही तेच घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला मुंबई, त्यानंतर २८ ऑगस्टला न्यू ऑर्लिन्स व त्यापाठोपाठ शांघाय २००५ मधे बुडाली.
अमेरिकेत ह्युस्टन शहरासह पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे ‘हार्वे’ नाव दिलेले, अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० किमी वेगाचे चक्रीवादळ आठवडाभरात दोनदा आदळले. अशा वेळी खाडय़ा, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याची आणि सागरी रस्ते व भुयारी रेल्वे, रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.
तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बॉन येथे झालेल्या युनोच्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते जाहीर झाले आहे. एव्हढा कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात साठला आहे की, त्याच्या उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे तापमान वाढतच राहणार आहे. कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश तत्काळ न थांबवल्यास मानवजात व जीवसृष्टी या शतकात नष्ट होणार आहे. म्हणजे औद्योगिकीकरण व शहरीकरण हा शाप ठरला आहे.
महासागरांचे पाणी आणि पर्वत व ध्रुव प्रदेशांवरील बर्फाची वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची रूढ अभिसरण पद्धती मोडली आहे. प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे. त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे. शहरे ‘उष्णता बेट’ परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून त्याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणाऱया सागराच्या पातळीतील वाढीमुळे मुंबई, न्यूयॉर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्टय़ा येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. आपल्याकडे मात्र तापमानवाढीला अधिक वेग देणाऱया २०३४ पर्यंतच्या विकास आराखडय़ाच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत. प्रसारमाध्यमे हितसंबंधांमुळे किंवा त्यांचा सहभाग असल्यामुळे त्याला हातभार लावत आहेत. आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.
मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या आयपीसीसीने हे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प व त्यातही मेट्रो – ३ हा भुयारी रेल्वे प्रकल्प व सागरी रस्ता यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्त्व देणे ही चूक आहे. कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायटय़ांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.
वांद्रे – कुर्ला संकुल मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वात खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले. तेथील इमारतींच्या तळमजल्याच्या वर संकुलाच्या रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही.
आम्ही वरळी-वांद्रे सागरी पूल प्रकल्पाविरुद्ध प्रखर आंदोलन केले. मच्छीमारांनी वांद्रे भूशिराच्या जवळ समुद्रात क्रेनमधुन टांगलेल्या एक – दोन टन वजनाच्या मोठय़ा दगडांखाली सतत आठ-दहा दिवस होडय़ा व बोटी लावून, जीव धोक्यात घालून भराव थांबवला. मुंबई वाचवण्यासाठी वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागात व प्रभादेवीच्या समुद्रात भराव करू दिला नाही. माहीम कॉजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला भरावाचा काही भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढून टाकावयास लावल्या. माहीमच्या खाडीत झोपडपट्टय़ा करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बऱयाच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.
मेट्रो-३ भुयारी रेल्वे हा बोगस प्रकल्प आहे. तो नियोजनात नव्हता. कोणत्याही वाहतूक अभ्यासाने त्याची शिफारस केली नाही. हा प्रकल्प ९० ते १२० फूट खोल असल्याने भविष्यात तो मुंबईकरांना बुडवून मारणार आहे असे दिसते. एल्फिन्स्टन पुलावर दिवसाढवळ्या घडणारी दुर्घटना हाताळता येत नाही, तर १०० फूट खाली माणसांना कसे वाचवणार?
फक्त २००० कोटी रुपयांत बेस्ट बसचा ताफा दुप्पट, तिप्पट करून व कर्मचाऱयांचे इतर प्रश्न सोडवून मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. गेल्या ३० वर्षांतील सर्व अहवालांनीदेखील बसला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे, पण त्याविरुद्ध जाऊन अनावश्यक बांधकामयुक्त महागडय़ा प्रकल्पांचा मारा करण्यात आला. याला बहुतेक मुंबईकरांची स्वतःला आधुनिक मानून पटकन खुळावली जाणारी तंत्रज्ञान संमोहित मानसिकतादेखील कारण आहे.
कृपया याला नकारात्मक विचार समजू नये. हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱया पृथ्वीची जपणूक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे. आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक, निराशावादी विचाराचा माणूस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.
तापमानवाढीचे सतत भान हवे. दरवर्षी दीड अंश सेल्सिअस म्हणजे पाच वर्षांत एक अंश से. अशी इतिहासात कोटय़वधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत आहे. फक्त येत्या ४ वर्षांत १७५०च्या तुलनेत २ अंश से. ची वाढ होत आहे. माध्यमे सांगतात त्याप्रमाणे २१०० मध्ये नाही. मानवजात वाचविण्यासाठी केलेला ‘पॅरिस करार’ अयशस्वी ठरत आहे. भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कॅनडात आता उष्णतेची अभूतपूर्व लाट चालू आहे. आतापर्यंत ५० च्या वर माणसे मरण पावली. जपानमधे तासाला चार इंच असा ऐतिहासिक विक्रमी पाऊस पडत आहे. महापूर आला आहे. ३० लाख नागरिकांना सुरक्षित जागी हलवले जात आहे व ५० हजार माणसे सुटका करण्याच्या कामाला लावण्यात आली आहेत. या घटनांची जाणीव हवी. त्याऐवजी बिनमहत्त्वाच्या हानीकारक गोष्टीत जग गुंतले आहे.
(लेखक मुंबई रक्षण समितीचे निमंत्रक आहेत.)




























































