फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरील टास्क कमिशनच्या मोहात तीन लाख गमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरील टास्क ऑर्डर कमिशनच्या मोहात तरुणीने तीन लाख रुपये गमावल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार तरुणी ही कांदिवली परिसरात राहते. गेल्या आठवडय़ात तरुणीला व्हॉट्सअॅपवर फोन आला होता. फोन करणाऱयाने तरुणीला फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरील ऑर्डरवर कमिशन मिळवता येते अशा भूलथापा मारल्या. कमिशन मिळणार या लालचेपोटी तरुणीने त्याला टास्कसाठी होकार दिला. होकार दिल्यानंतर तरुणीला मोबाईलवर एक लिंक पाठवली गेली. ती लिंक भरून पाठवल्यानंतर कमिशन मिळेल असे तिला सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तरुणीने मोबाईलवर आलेली लिंक उघडली. लिंक उघडताच सुरुवातीला तरुणीला 68 रुपये मिळाले.

सुरुवातीची रक्कम मिळाल्यानंतर ठगाने तरुणीला फोन करून पॉपअप रिचार्ज म्हणून दोनशे रुपये भरण्यास सांगितले. कमिशनच्या मोहात तरुणीने पैसे भरले. पैसे भरल्यानंतर तरुणीला अधिक टास्क खेळण्याबाबत विचारणा केली. कमिशन मिळेल या हेतून तरुणीने होकार दिला. होकार दिल्यानंतर तरुणीला टास्क खेळण्याबाबत विचारणा करून दीड हजार रुपये भरण्यास भाग पाडले. विश्वास बसावा म्हणून ठगाने सतराशे रुपये कमिशन म्हणून दिले. कमिशन अधिक मिळणार या लालचेने तरुणीने पुन्हा तीन हजार रुपयाचे रिचार्ज केले. रिचार्ज केल्यानंतर ठगाने तरुणीला 12 ऑर्डरचा टास्क पूर्ण केल्यास अधिक कमिशन मिळेल अशा भूलथापा मारल्या. कमिशनच्या नादात तरुणीने 12 ऑर्डरसाठी 3 लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर तरुणीला कमिशन दिले नाही. कमिशनबाबत तरुणीने विचारणा केली असता तुमच्या 12 पैकी 10 ऑर्डर पूर्ण झाल्या आहे. 12 ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कमिशन दिले जाते असे तरुणीला सांगण्यात आले. त्यानंतर तरुणीने ठगाकडे पैसे परत मागितले असता त्याने नकार दिला. तरुणीने घडल्या प्रकाराची माहिती तिच्या मित्राला दिली. मित्राने हा फसवणुकीचा नवा प्रकार असल्याचे तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणीने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली.