संतापजनक! संपत्ती हडपण्यासाठी बहिणीचा छळ, खोलीत डांबून मानवी मूत्र पाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील भागकोहलीया पंचायतीमधील लबाना टोली येथे भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. संपत्ती हडपण्यासाठी एका भावाने व त्याच्या पत्नीने बहिणीला अमानुष मारहाण करून हात-पाय बांधून 4 दिवस अन्न-पाण्यावाचून कोंडून ठेवले होते. तसेच भुकेने व्याकुळ झालेल्या बहिणीने पिण्यासाठी पाणी मागितले असता, तिला मानवी मूत्र पाजल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

संपत्तीसाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. भाऊ आणि भावजयीने पीडित तरुणीला घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत डांबले होते. गावकऱ्यांना या प्रकरणाची चाहूल लागल्यावर त्यांनी या तरुणीची भाऊ – भावजयीच्या जोखडातून सुटका केली व तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आपले आई-वडील मृत पावले असून संपत्ती हडपण्यासाठी भाऊ मझं लग्नदेखील होऊ देत नाही. मला मारहाण करून घरातून हाकलण्याचा प्रयत्न करतो असा आरोप पीडित तरूणीने केला आहे. मात्र तिचा भाऊ रुस्तम याने त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगून, ती मानसिक रुग्ण असल्याचा कांगावा केला आहे.