अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया एका आरोपीला जिल्हा व सत्रन्यायाधीश कविता शिरभाते यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात पीडित मुलगी व फिर्यादी दोघेही फितूर असताना डीएनए रिपोर्टवरून ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. संतोष लक्ष्मण चव्हाण (रा. अक्कलकोट) असे आरोपीचे नाव आहे.

संतोष चव्हाण हा रेल्वेत नोकरीला आहे. अल्पवयीन मुलगी ही शिक्षणासाठी नातेवाईक असलेल्या चव्हाणकडे राहण्यास होती. घरी कोणी नसताना चव्हाण याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यात ती गर्भवती राहिली होती. तिला उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, तेथून ती निघून गेली होती. याची खबर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

दरम्यान, पीडित मुलीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मुलगा झाला. या मुलाचे डीएनए व आरोपीचे डीएनए नमुने तपासणी करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात चार साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व फिर्यादी दोघे फितूर झाले होते. न्यायालयाने वैद्यकीय अहवाल व डीएनए रिपोर्टवरून आरोपी संतोष चव्हाण याला 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारच्या वतीने ऍड. प्रकाश जन्नू, तर आरोपीच्या वतीने ऍड. शेख यांनी काम पाहिले.