
देशभरात एकाचवेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसोबत संतापजक प्रकार झाल्याचे समोर आले आहे. सांगलीमध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनींना कपडे उलटे घालायला लावले, तसेच अंतर्वस्त्रांचीही तपासणी केली. या प्रकरणाची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशभरात एकाच वेळी झालेल्या नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अत्यंत चुकीची तपासणी केल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांनी समोर आणली आहे. आपल्या राज्याबाबत बोलायचं झाल्यास, सांगलीमध्ये विद्यार्थिनींना कपडे उलटे घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणं अशा तक्रारी आल्या आहेत. तक्रार दाखल झाल्याने सांगली मधील प्रकार समोर आला आहे. मात्र ही परीक्षा संपूर्ण राज्य भरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या.
नीट परीक्षेवेळी सांगली येथील परीक्षा केंद्रांवर विद्यार्थिनींसोबत संतापजनक प्रकार झाल्याचे समोर आले असून राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे.#SaamanaOnline #RupaliChakankar pic.twitter.com/R2YwBacee9
— Saamana (@SaamanaOnline) May 10, 2023
परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. अशी तपासणी करण्याच्या सूचना कोणी दिल्या? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांना याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही ते म्हणाल्या.































































