गोव्यात पन्नास हजार झाडांची कत्तल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा राज्यात तीन पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रस्तावांना जर राज्य सरकारने संमती दिली तर गोव्यात सुमारे 50 हजार झाडांची कत्तल होणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्य जीव मंडळाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत वृक्षतोडीवर चर्चा झाली, मात्र सध्या तरी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रस्तावित प्रकल्प वन्य जीव अभयारण्यातून जाणार आहेत. त्यामुळे बेसुमार वृक्षतोड होणार आहे.

प्रस्तावित प्रकल्प 

 दक्षिण-पश्चिम रेल्वे ट्रकवर कास्टररॉक- कॉलेम- मडगाव रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण

 अनमोड-मॉलेम सीमा भागात राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरण

 मॉलेम येथील भगवान महावीर वन्य जीव अभयारण्यमध्ये नवीन ट्रान्समिशन लाइन

वृक्षतोड कशी होणार

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्गासाठी 135 एकर वन जमिनीची गरज असून त्यावरील 21 हजार झाडे तोडावी लागतील. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पासाठी 33 हेक्टर जागा लागेल. तेथील 12,097 झाडे कापावी लागतील. ट्रान्समिशन लाइन प्रकल्पासाठी 48 हेक्टर जागेवरील 16 हजार झाडे तोडली जातील.