गोवा एलईडी टॉलरवर मालवण समुद्रात कारवाई

487

प्रखर प्रकाशझोतातील (एलईडी) मासेमारी करण्यास केंद्र सरकराने बंदी घातली आहे. मात्र परराज्यातील नौकांकडून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासळीची लूट सुरूच आहे. मालवण किनाऱ्यापासून २० वाव समुद्रात एलईडी पद्धतीने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या गोव्यातील एलईडी नौकेवर मत्स्य विभागाने रविवारी मध्यरात्री कारवाई केली. पकडलेल्या ट्रॉलर पासून काही अंतरावर एक पर्ससीन ट्रॉलर होता मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पकडलेल्या नौकेवर कोणत्याही प्रकारची मासळी आढळून आली नाही. मात्र नौकेसह एलईडी दिवे व अन्य साहित्य मत्स्य विभागाने ताब्यात घेतले.

मालवण समुद्रातही परराज्यातील नौकांकडून घुसखोरी सुरू असल्याने मत्स्य विभागाचे पथक समुद्रात सोमवारी रात्री गस्त घालत असताना एलईडी तसेच पर्ससीन पद्धतीने मासेमारी करतांना नौका सापडून आली. यावेळी मत्स्य विभागाच्या पथकाने एलईडी नौकेवर कारवाई केली. मत्स्यविभागाच्या पथकाला मालवण समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा गोवा येथील अल्बर्ट डिसोजा यांची ‘सी एन्जल’ ही एलईडी नौका पकडण्यास यश आले.

तहसीलदारांकडे कारवाई प्रस्ताव

कारवाईत एलईडी नौकेवर दोन हजार व्हॉटचे पाच एलईडी बल्ब, पंधरा मीटरची केबल, एक जनरेटर, 1800 व्हॉलटचे दोन सबमर्सीबल बल्ब आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या एलईडी नौकेवर मासळी आढळली नसल्याची माहिती मत्स्यविभागाने दिली. कारवाईत पकडलेली नौका मालवण बंदरात उभी करून ठेवण्यात आलेली आहे. या नौकेवरील दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव मंगळवारी तहसील प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती परवाना अधिकारी शिवराज चव्हाण यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या