इफ्फीत आंतरराष्ट्रीय विभागात 15 चित्रपटांची निवड, मी वसंतराव, गोदावरी ‘सुवर्ण मयूर’च्या शर्यतीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेविश्वात अत्यंत प्रतिष्ठsच्या समजल्या जाणाऱया इफ्फी, अर्थात हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार कोणता चित्रपट पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या महोत्सवात 15 चित्रपट मानाच्या सुवर्ण मयूर आणि इतर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. त्यात तीन हिंदुस्थानी चित्रपटांचा समावेश असून त्यापैकी दोन मराठी चित्रपट आहेत.

निपुण धर्माधिकारीचा ‘मी वसंतराव’ आणि जितेंद्र जोशीचा ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटांची सुवर्ण मयूर या मानाच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मी वसंतराव हा चित्रपट ज्येष्ठ गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. गोदावरी या चित्रपटात नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाची आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट या चित्रपटातून अनुभवता येईल. याशिवाय या स्पर्धेसाठी एमी बरुआ दिग्दर्शित ‘सेमखोर’ या हिंदुस्थानी चित्रपटाची देखील निवड झाली आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरया कालावधीत 52 वा इफ्फी महोत्सव रंगणार आहे.

स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये एनी डे नाऊ (फिनलॅण्ड), शार्लोट (पॅराग्वे), एंट्रेगलडे (रोमानिया), लॅण्ड ऑफ ड्रीम्स (अमेरिका), लीडर (पोलंड), मॉस्को डझ नॉट हॅप्पन (रशिया), नो ग्राऊंड बीनीथ द फीट (बांगला देश), रिंग वंडेरिंग (जपान), सेव्हिंग वन व्हू वॉज डेड (झेक प्रजासत्ताक), द डॉर्म (रशिया), द फर्स्ट फॉलन (ब्राझील) या चित्रपटांचा देखील समावेश आहे.