संजय दत्त बनला UAEचा गोल्डन व्हीसा मिळवणारा पहिला अभिनेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता संजय दत्त हा कर्करोगावर मात करून परतला आहे. संजय दत्त आणि त्याचं कुटुंब हे बहुतांश काळ दुबईमध्येच असतं. अशातच आता संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीने गोल्डन व्हीसा दिला आहे. हा व्हीसा मिळवणारा संजय दत्त हा पहिला अभिनेता आहे. संजय दत्तने हा व्हीसा दिल्याबद्दल तिथल्या अधिकाऱ्यांचे आणि सरकारचे आभार मानले आहेत.


View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

संजय दत्त त्याची बायको मान्यता दत्त आणि त्यांची दोन्ही मुले ही दुबईमध्ये असून त्यांनी यंदाची रमजान ईद दुबईमध्ये साजरी केला. मान्यताने दुबईमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संजय दत्तने व्हीसा मिळाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याला किती आनंद झाला आहे हे कळतंय. कारण हा व्हीसा मिळवणारा तो पहिला अभिनेता असून तो ठराविक लोकांनाच दिला जातो. संयुक्त अरब अमिरातीने दीर्घकालीन वास्तव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या धोरणात काही बदल केले होते. 2019 साली हे बदल करण्यात आले होते. या बदलांमुळे ठराविक क्षेत्रातील कामासाठी, शिकण्यासाठी किंवा राहण्यासाठी येणाऱ्या विदेशी नागरिकांना दिलासा मिळाला होता. गोल्डन व्हीसा हा 5 ते 10 वर्ष या कालावधीसाठी दिला जातो आणि तो आपोआप रिन्यू होतो म्हणजेच त्याची मुदतवाढ आपोआप होते.

हा व्हिसा जगातील 500 विद्यापीठातील पीएचडी धारकांना मिळू शकतो. डॉक्टरांनाही हा व्हीसा दिला जातो. या गोल्डन व्हीसामुळे महामारीच्या काळात डॉक्टरांचा संयुक्त अरब अमिरातीला तुटवडा जाणवला नाही. साथरोगाबाबत संशोधन करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनाही या व्हीसाने सन्मानित केलं जातं. अभियंते, संशोधक, नवनवीन गोष्टींचा शोध लावणारी मंडळी या सगळ्यांना हा व्हीसा दिला जातो. त्यासाठीचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकारांमध्ये मोडत नसतानाही संजय दत्तला हा व्हीसा देण्यात आला आहे. यामुळे आता बॉलीवूड कलाकारांनाही हा व्हीसा मिळण्यास सुरूवात होईल असं बोललं जात आहे.