एक कोटीचे बक्षीस, मुख्यमंत्र्यांबद्दलचे वक्तव्य 2013मधले; गोपाळ शेट्टी यांनी केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कबड्डीत सुवर्णपदक मिळवणाऱया मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या मुलीला एक कोटीचे बक्षीस देण्यात आल्याबाबत आक्षेप घेणारे माझे वक्तव्य आताचे नाही तर 2013मधले आहे. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते, असे भाजपचे उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

गेली 35 वर्षे मी क्रीडा, सामाजिक जीवनात कार्यरत आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांबद्दल सरकारने योग्य ते धोरण ठरवावे, यासाठी मी नेहमीच आग्रह धरला आहे. आमदार असताना वेळोवेळी तत्कालीन राज्य सरकार आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्दय़ावर आवाज उठवून मी पाठपुरावा केला होता. असेच 2013मधले तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उद्देशून केलेले माझे विधान आता नव्याने माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. एक कोटीच्या बक्षिसाबाबत जे वृत्त समोर आले आहे त्याचा आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी काहीही संबंध नाही, असे गोपाळ शेट्टी यांनी नमूद केले आहे.