
सामना प्रतिनिधी । मुंबई
गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे केली जाणार असून पावसाळ्याव्यतिरिक्त 18 महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे आज पालिकेने स्पष्ट केले. दरम्यान, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा याच रुग्णालयाच्या अपघात विभागात 24 तास सुरू असून सर्वसाधारण बाह्य रुग्ण विभागदेखील पहिल्या मजल्यावर सुरू ठेवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या माध्यमिक आरोग्य सेवेचे खातेप्रमुख डॉ. शशिकांत काडेकर यांनी दिली.
गोरेगाव पश्चिम परिसरात पालिकेचे 172 खाटांचे ‘सिद्धार्थ सर्वोपचार रुग्णालय’ आहे. मात्र हे रुग्णालय बंद केले जात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने माहिती देताना रुग्णालयात दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रुग्णालयाची इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ‘सी-2’ घोषित करण्यात आली होती. पाहणीदरम्यान इमारतींच्या खांबांना तडे गेल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे दुरुस्तीनंतर हे रुग्णालय आहे त्याच जागी पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचेही पालिकेने सांगितले आहे.
या ठिकाणी झाले विभागांचे स्थलांतर
- जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात अतिदक्षता विभाग आणि ए. आर. टी. सेंटर स्थलांतरित करण्यात आले आहे.
- कांदिवली पश्चिम येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात शल्यचिकित्सा विभाग, अस्थिव्यंग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्रचिकित्सा विभाग, स्त्रीरोग चिकित्सा विभाग, मनोविकार चिकित्सा विभाग, आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभाग स्थलांतरित करण्यात आले आहेत.
- बोरिवली पश्चिम येथील श्री हरीलाल भगवती रुग्णालयात वैद्यकीय चिकित्सा विभाग, बालरोग चिकित्सा विभाग, त्वचारोग चिकित्सा विभाग आणि दंत चिकित्सा विभाग स्थलांतरित करण्यात आला आहे.


























































